

उच्चशिक्षित तरुणी गातेय लग्नात धवला गीत
धवलारीन अवनी पाटील जपतेय आपली आगरी कोळी परंपरा
वसंत जाधव ः सकाळ वृतसेवा
पनवेल (बातमीदार) ः
दांडी कोलवा न्हावी बोलवा
सोन्याचा वर्तारा रुप्याच्या प्याला
मोह्या कारिल्या चंद्राच्या कोरा
पूर नाचाला बहिणी बोलावा
दिवा धरला फुया बोलावा
पाठी बसला आई बोलावा
अशा प्रकारची धवला गीते आपल्याला आजही आगरी कोळी समाजाच्या लग्नसमारंभात कानी पडतात. या धवलगीतांतून आगरी समाजाने आपला सांस्कृतिक वारसा आजतागायत जपला आहे. धवलगीत म्हणणाऱ्या महिलांना धवलारीन असं म्हटल जातं. शक्यतो या धवलारीन बाया ५० ते ७० या वयोगटातील असतात. पूर्वीसारख्या धवलागीत गाणाऱ्या महिला आजच्या जेन झीच्या युगात कमी असल्या तरीदेखील धवलागीताची संस्कृती मात्र आजही टिकवून ठेवलीय ती डोंबिवली येथील उच्चशिक्षित तरुणी अवनी पाटील हिने.
अंबरनाथ माहेर असलेल्या अवनीने ठाणे येथून सिव्हिल इंजिनिअरिंग केले आहे. या तरुणीने आपल्या गोड गळ्याने पारंपरिक धवला गाण्याचे समाज माध्यमावर लाखो फॅन जमवले आहेत. आगरी समाजातील लग्नकार्यात धवलारनीला विशेष सन्मान असतो आणि समाजात हा सन्मान अवनीने धवलागीत गाऊन मिळवला आहे. धवलारीन म्हणजे लग्नसमारंभाच्या सुरुवातीपासून शेवटापर्यंत गाव कारभाऱ्यांच्या जोडीने पारंपरिक पद्धतीने सर्व रीतीरिवाज, प्रथा सांभाळून लग्नकार्य यथायोग्य पार पाडणारी अनुभवी स्त्री. अशी सर्व कामे अवनी अगदी आवडीने करते. हे करीत असताना तिला अनेकदा टीकेलाही सामोरे जावे लागले. पण त्याहीपेक्षा जास्त तिला कौतुकही मिळत आहे. याच पाठीवर थाप देणाऱ्या तिच्या चाहत्यांमुळे तिला आणखी जोमाने गाण्याची ऊर्मी मिळत असल्याचे तिने सांगितले.
धवलीन पद्धत कशी पडली
फार पूर्वी देशातील जातीभेदाच्या काळात सवर्ण समाजातील पुरोहित आगरी लोकांची लग्नकार्य करीत नसत. त्या काळात लग्नकार्याचे पौरोहित्य आपल्या सबळ आणि अनुभवी खांद्यावर लीलया पेलून धरणाऱ्या कणखर स्त्रिया म्हणून धवलारीन. लग्नकार्यात ही प्रथा आगरी कोळी समाजाने आपली केल्याचे या समाजातील ज्येष्ठ मंडळी सांगतात. लग्नकार्यात धवलारनीचे काम हळदीपासून लग्न ते अगदी वरात घरी पोचून घरी बसवलेले देव पुन्हा हलवून शांत करेपर्यंत चालते.
‘‘तू येवरी शिकलेली हंस, तू कशाला ह्यो धवलाबिवला गातंस?’’ अनेक जण मला हा प्रश्न करतात. आगरी समाजातील लग्नात ब्राह्मण म्हणून काम करणाऱ्या ढोकरी माणसासोबत धवलारीनसुद्धा लुप्त होत चालली आहे. आगरी कोळी लग्नात जेव्हा धवरीन धवला गात असते तेव्हा वेगळ्याच प्रकारचा काटा अंगावर उभा राहतो. यात विशेष काही तरी हं म्हणून मी धवला गाते. आगरी कोळी लग्नातील धवलारीन परंपरा वर्षानुवर्षे टिकली पाहिजे. धवलारीन शान आपली, लोका मना नावं ठेवतान पण मी गात राहीन; तुम्ही नावं ठेवत राहा.
- अवनी पाटील, धवलारीगीत गायक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.