

वाशी रेल्वे स्थानकावरील नऊ नळ बंद
ऑक्टोबर हीटच्या तडाख्यात प्रवाशांची पाण्यासाठी फरपट
तुर्भे, ता. १२ (बातमीदार) : मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावरील गजबजलेल्या वाशी रेल्वे स्थानकात पिण्याच्या पाण्याची सुविधा ठप्प झाल्याने हजारो प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. स्थानकातील चारही फलाटांवरील सर्वच्या सर्व नऊ नळ बंद असून, दिव्यांग प्रवाशांसाठी बसविण्यात आलेल्या नळांच्या तोट्याही गायब झाल्याचे समोर आले आहे. ऐन ऑक्टोबर महिन्यातील उकाड्याच्या दिवसांत प्रवाशांना पाण्यासाठी स्थानकाबाहेर जाऊन बाटल्या विकत घ्याव्या लागत असून, रेल्वे प्रशासन आणि सिडकोच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित होत आहेत.
वाशी हे नवी मुंबईतील महत्त्वाचे रेल्वे स्थानक असून, येथून दररोज हजारो प्रवासी प्रवास करतात. अशा स्थानकावर पिण्याच्या पाण्यासारखी मूलभूत सुविधा उपलब्ध नसल्याने प्रवाशांमध्ये नाराजी आहे. दिव्यांग प्रवाशांसाठी सुविधा उपलब्ध करून देण्याचे दावे केले जात असताना, प्रत्यक्षात त्यांच्यासाठी बसविण्यात आलेल्या नळांच्या तोट्याच गायब झाल्या आहेत. त्यामुळे दिव्यांगांसह सर्वसामान्य प्रवाशांचीही गैरसोय होत आहे. स्थानकावरील सर्व नऊ नळांचे कनेक्शन बंद असल्याने प्रवाशांबरोबरच स्वच्छता कर्मचाऱ्यांनाही पाण्याअभावी अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे सांगण्यात येत आहे. स्थानकाची स्वच्छता राखण्यासाठी पाणी आवश्यक असताना ही सुविधा बंद असल्याने स्वच्छतेच्या कामावरही परिणाम होण्याची शक्यता आहे.
उपाययोजनेचे आश्वासन
या समस्येबाबत वाशी स्थानकाचे मास्तर गिरी यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी सुरुवातीला पाण्याची गैरसोय होत असल्याचे नाकारले. मात्र, प्रत्यक्ष परिस्थिती निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी स्वच्छता कर्मचारी आणि सिडकोशी संबंधित व्यवस्थेचा उल्लेख केला. तसेच रेल्वे प्रशासन आणि सिडकोला याबाबत कळवून समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन दिले.
अनेक महिन्यांपासून तक्रारींकडे दुर्लक्ष?
स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, नळ बंद असल्याबाबत गेल्या अनेक महिन्यांपासून स्थानक मास्तरांना माहिती दिली जात आहे. मात्र अद्याप ठोस उपाययोजना करण्यात आली नसल्याचा त्यांचा दावा आहे. कर्मचाऱ्यांकडून वारंवार तक्रारी करूनही पाण्याची सुविधा पूर्ववत झाली नसल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित होत आहेत.
तातडीच्या दुरुस्तीची मागणी
स्थानकावरील पाण्याच्या समस्येकडे समाजिक कार्यकर्ते रेणू पांडे यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. बंद असलेले सर्व नऊ नळ तातडीने सुरू करावेत, तुटलेल्या तोट्यांची दुरुस्ती करावी आणि दिव्यांग प्रवाशांसाठी पिण्याच्या पाण्याची सुविधा पूर्ववत करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. नवी मुंबईतील बहुतांश रेल्वे स्थानकांवरही अशाच प्रकारची परिस्थिती असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
जबाबदारी रेल्वेची की सिडकोची?
रेल्वे स्थानकावरील पिण्याच्या पाण्याची सुविधा सुरू ठेवण्याची जबाबदारी नेमकी कोणाची, याबाबत रेल्वे प्रशासन आणि सिडको यांच्यात समन्वय आहे का, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. जबाबदारी निश्चित करण्याबरोबरच बंद नळांची दुरुस्ती करून प्रवाशांना तातडीने दिलासा देणे आवश्यक आहे. आता रेल्वे प्रशासन आणि सिडको या समस्येची दखल घेऊन प्रत्यक्षात कधी उपाययोजना करतात, याकडे प्रवाशांचे लक्ष लागले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.