काँक्रीटच्या कोंडीतून झाडांची सुटका होणार!

काँक्रीटच्या कोंडीतून झाडांची सुटका होणार!
Published on: 

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १२ : शहरातील रस्ते आणि पदपथांच्या विकासकामांमध्ये झाडांच्या खोडांपर्यंत काँक्रीट टाकले जात असल्याने त्यांच्या नैसर्गिक वाढीवर परिणाम होत आहे. या प्रकाराला आळा घालण्यासाठी ठाणे महापालिकेने आता सहा हजार १९२ झाडांच्या भोवतालचे काँक्रीट काढण्याची योजना तयार केली आहे. शहरातील नऊ प्रभाग समित्यांच्या हद्दीत राबविण्यात येणाऱ्या या कामासाठी ४४ लाख ७३ हजारांचा खर्च अपेक्षित आहे. यासंदर्भातील प्रस्ताव महासभेच्या मंजुरीसाठी पटलावर ठेवण्यात आला आहे.

शहरात रस्ते आणि पदपथांचे काँक्रीटीकरण करताना झाडांच्या खोडांभोवतीही पक्के बांधकाम केले जाते. त्यामुळे पावसाचे पाणी जमिनीत मुरण्याची प्रक्रिया बाधित होते. मुळांना आवश्यक हवा आणि ओलावा मिळण्यात अडथळे निर्माण होतात. परिणामी, झाडांच्या आरोग्यावर आणि वाढीवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते. ही बाब लक्षात घेऊन झाडांच्या खोडांभोवतीची जागा मोकळी करण्याचे महापालिकेने प्रस्तावित केले आहे. प्रस्तावानुसार, उथळसर प्रभाग समितीच्या हद्दीत सर्वाधिक एक हजार सहा झाडांभोवतीचे काँक्रीट हटविले जाणार आहे.

या कामांसाठी प्रभाग समितीनिहाय नऊ स्वतंत्र निविदा काढण्याचे नियोजन आहे. खर्चाचे अंदाजपत्रक सार्वजनिक बांधकाम विभागाच्या २०२२-२३ च्या मंजूर दरसूचीनुसार तयार करण्यात आले आहे. दरसूचीत नसलेल्या बाबींसाठी अन्य शासकीय दरसूची किंवा चालू बाजारभावाचा आधार घेण्यात आला आहे.

निधीअभावी प्रस्ताव अडकण्याची शक्यता
काँक्रीट हटविण्याच्या कामाचा खर्च महापालिकेच्या ‘रस्ते दुरुस्ती’ या लेखाशीर्षाखाली दाखविण्यात आला आहे, मात्र या लेखाशीर्षाखाली अर्थसंकल्पीय तरतूद उपलब्ध नसल्याने दायित्व स्वीकारण्याची मान्यता मागण्यात आली आहे. प्रशासकीय व वित्तीय मान्यतेसह निविदा प्रक्रियेला मंजुरी मिळावी, अशी मागणीही प्रस्तावातून करण्यात आली आहे.

झाडांच्या भोवतालची जागा मोकळी
प्रभाग समिती झाडांची सुटका
कळवा ९३९
माजिवडा-मानपाडा ९१०
वर्तकनगर ७०१
नौपाडा-कोपरी ६००
मुंब्रा ६०९
लोकमान्यनगर-सावरकरनगर ५४०
वागळे ५१२
दिवा ३७५

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com