

‘झीरो वेस्ट’ आणि निसर्ग संवर्धनाची अनोखी चळवळ
पर्यावरणतज्ज्ञ छाया तार्लेकर यांनी कचऱ्यातून निर्माण केले ‘ब्लॅक गोल्ड’
सुजित गायकवाड, सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. १३ : शारदीय नवरात्रोत्सवाच्या पावन पर्वात आदिशक्तीच्या विविध रूपांचे पूजन केले जात असतानाच, समाजात पर्यावरणाचे रक्षण करणारी एक आदिशक्ती आपल्या अनोख्या उपक्रमाने निसर्ग संवर्धनाचा संदेश देत आहे. घरामध्ये दररोज निर्माण होणारा ओला कचरा बाहेर फेकून न देता, तो घरातच जिरवून त्यापासून उत्तम दर्जाचे खत म्हणजे ब्लॅक गोल्ड बनवणे आणि सेंद्रिय शेती फुलवणे, असा ध्यास पर्यावरणतज्ज्ञ छाया तार्लेकर यांनी घेतला आहे.
व्यवसायाने वकील असलेल्या छाया तार्लेकर यांनी आफ्रिकेत वास्तव्यास असताना २००९ मध्ये शिकागो बोटॅनिकल गार्डनमधून सेंद्रिय खतनिर्मिती आणि कार्बन-नायट्रोजन संतुलनाचे तंत्रज्ञान शिकून घेतले. त्यानंतर २०१२ पासून त्यांनी आपल्या घरातूनच या चळवळीची सुरुवात केली. गेल्या १२ वर्षांत त्यांनी आपल्या घरातील ओला कचरा कधीही घराबाहेर फेकला नाही. घरातील कचरा, फळांच्या व भाज्यांच्या साली आणि फुलांपासून खत तयार करून त्यांनी आपल्या गॅलरीत तब्बल ८७ झाडे फुलवली असून, त्यातून त्या स्वतःसाठी लागणाऱ्या भाज्या उगवत आहेत. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन २०१६ मध्ये पनवेल पालिकेकडून त्यांना ‘स्वच्छता दूत’ पुरस्काराने सन्मानित केले आहे. आपले हे ज्ञान स्वतःपुरते मर्यादित न ठेवता समाजासाठी उपयोगी पडावे, या उद्देशाने तार्लेकर यांनी नवी मुंबई, पनवेल आणि खारघर परिसरातील २५० हून अधिक गृहनिर्माण सोसायट्या, लेडीज क्लब आणि शाळांमध्ये जाऊन झीरो गार्बेज (शून्य कचरा) आणि कम्पोस्टिंगचे प्रशिक्षण दिले. त्याचप्रमाणे, भावी पिढीला निसर्गाशी जोडण्यासाठी त्यांनी कनेक्ट विथ नेचर आणि नेचर टू नर्चर ही पुस्तके लिहिली असून, त्याद्वारे १८ सोपे प्रयोग मांडले आहेत. यामध्ये केळीच्या सालींचा द्रवरूप खत म्हणून वापर, मायक्रोग्रीन्स (सेंद्रिय मोड आलेली कडधान्ये) उगवणे आणि हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञानाचा समावेश आहे. सध्या शाळांमध्ये न्यू सरस्वती सिटी हायस्कूल आणि समर्थ विद्यामंदिर (सेक्टर १२) येथे ग्रंथालयांची उभारणी करून मुलांमध्ये वाचन संस्कृती आणि निसर्गाविषयी लेखन करण्याची आवड त्या निर्माण करत आहेत.
झोपडपट्टीतील बालकांसाठी आणि दिव्यांग मुलांसाठी विशेष पुढाकार
सध्या रोटरी क्लबच्या अध्यक्ष म्हणून काम करत असताना त्यांनी तुर्भे परिसरातील इंदिरानगर, आंबेडकरनगर, हनुमाननगर, एचपी क्वेरी आणि पावणे व्हिलेज या झोपडपट्ट्यांमधील पाच चाइल्ड लर्निंग सेंटरमधील सुमारे १८० बालकांना प्रात्यक्षिकांसह पर्यावरण धडे देण्यास सुरुवात केली आहे. गाणी आणि खेळांच्या माध्यमातून ही मुले स्वतः मायक्रोग्रीन्स आणि भाज्या उगवत आहेत. याशिवाय, निपिड संस्थेतील विशेष व शारीरिकदृष्ट्या सक्षम नसलेल्या मुलांनाही त्यांनी झाडांचे खोड आणि पानांच्या स्पर्शाने व वासाने निसर्ग ओळखण्याचे शिक्षण दिले आहे.
‘से नो टू प्लॅस्टिक’ आणि महिला सक्षमीकरण
कचरा व्यवस्थापनासोबतच त्यांनी प्लॅस्टिकमुक्तीचा मोठा लढा उभारला आहे. जुन्या साड्या, चादरी व पडदे गोळा करून भारत विकास परिषद आणि महिला बचत गटांच्या माध्यमातून त्या दरवर्षी तीन ते चार हजार कापडी पिशव्या तयार करून घेतात. यामुळे सुमारे ४० महिलांना थेट रोजगार मिळतो. या पिशव्यांचे वाटप खारघरच्या ग्रामविकास भवनातील बाजारात करून नागरिकांना प्लॅस्टिक पिशव्या न वापरण्याची शपथ दिली जाते. तसेच, शाळांमध्ये जुन्या टी-शर्टला कोणत्याही शिलाईशिवाय गाठी मारून पिशवी बनवण्याचे तंत्रज्ञान त्या विद्यार्थ्यांना शिकवत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.