

पतीच्या जीवनासाठी स्वतःची किडनी दान करणारी वहिदा मुजावर
प्रेम, त्याग आणि धैर्याची प्रेरणादायी कहाणी
नीलेश मोरे ः सकाळ वृत्तसेवा
घाटकोपर, ता. १३ ः स्त्री म्हणजे माया, ममता आणि त्यागाचे प्रतीक. कुटुंबावर संकट आले की ती खंबीरपणे उभी राहते. आपल्या माणसांच्या सुखासाठी ती स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवते. जेव्हा आपल्या जोडीदाराच्या आयुष्यावरच संकट येते, तेव्हा त्याला वाचवण्यासाठी स्वतःच्या शरीराचा अवयव दान करण्याचा निर्णय घेणे, यासाठी विलक्षण धैर्य आणि निस्सीम प्रेमाची गरज असते. असेच प्रेम, त्याग आणि जिद्दीची प्रेरणादायी कहाणी आहे वहिदा इस्माईल मुजावर यांची.
घाटकोपर पश्चिमेतील एस. टी. मेहता शाळेत बस अटेंडंट म्हणून काम करणाऱ्या वहिदा यांचे वय अवघे ४३ वर्षे. मूळच्या कराडच्या असलेल्या वहिदा दोन मुलांची आई आहेत. दोन्ही मुले शिक्षण घेत असून, कुटुंबाच्या जबाबदाऱ्या सांभाळत त्या आपले काम प्रामाणिकपणे करतात. मात्र, त्यांच्या आयुष्यातील सर्वांत मोठी परीक्षा आली ती पतीच्या गंभीर आजारामुळे.
वहिदा यांचा इस्माईल मुजावर यांच्याशी २००६ मध्ये विवाह झाला. संसाराची विविध स्वप्ने पाहत असताना २०१० मध्ये वहिदा यांचे पती यांना किडनीचा त्रास जाणवू लागला. वहिदा यांचे पती अनेक वर्षांपासून किडनीच्या आजाराने त्रस्त होते. पतीची खालावत जाणारी प्रकृती आणि आजारामुळे त्यांना सहन करावा लागणारा त्रास पाहून वहिदा यांच्या मनात एकच विचार होता, तो म्हणजे आपल्या पतीला पुन्हा निरोगी आयुष्य जगता यावे.
कुटुंबातील एखादी व्यक्ती आजारी पडली, की संपूर्ण कुटुंबाचे आयुष्य बदलून जाते. रुग्णाच्या वेदनांसोबतच त्याच्या कुटुंबीयांची मानसिक घालमेलही वाढते. अशा परिस्थितीत धीर देणे, जबाबदाऱ्या सांभाळणे आणि संकटाचा सामना करणे सोपे नसते. वहिदा यांनीही या कठीण काळाचा सामना केला. दरम्यान, पतीच्या आयुष्याला नवी संधी मिळावी, यासाठी त्यांनी एक मोठा निर्णय घेतला.
२०१५ मध्ये वहिदा यांनी आपल्या पतीला किडनी दान केली. स्वतःच्या शरीराचा अविभाज्य भाग पतीच्या जीवनासाठी देण्याचा त्यांचा हा निर्णय केवळ वैवाहिक नात्यातील प्रेम व्यक्त करणारा नव्हता, तर संकटासमोर हार न मानणाऱ्या एका स्त्रीच्या असामान्य धैर्याची साक्ष देणारा होता. लग्नात सुख-दुःखात एकमेकांना साथ देण्याची शपथ घेतली जाते. या शपथेचाच अर्थ प्रत्यक्ष आयुष्यात कृतीतून सिद्ध करणाऱ्या व्यक्तींची उदाहरणे मनाला स्पर्शून जातात. वहिदा यांनी पतीसाठी घेतलेला निर्णय म्हणजे याच प्रेमाची आणि बांधिलकीची साक्ष आहे.
पतीच्या निधनानंतर कुटुंबाची जबाबदारी
२०१५ मध्ये पतीला किडनी दान केल्यानंतर अवघ्या १० वर्षांत २०२५ मध्ये पतीचे निधन झाले. पतीच्या निधनानंतर वहिदा यांच्यावर मोठी जबाबदारी आली.
दोन मुलांच्या भविष्यासाठीही खंबीर आधार
वहिदा या केवळ पतीच्या आयुष्यातील जीवनसाथी नाहीत, तर आपल्या दोन मुलांच्या आयुष्याचा महत्त्वाचा आधारही आहेत. दोन्ही मुले शाळेत शिक्षण घेत आहेत. मुलांचे शिक्षण, घराची जबाबदारी आणि नोकरी या सगळ्यांचा समतोल साधत त्या आपल्या कुटुंबासाठी मेहनत करतात. आई म्हणून मुलांना चांगले भविष्य मिळावे, त्यांचे शिक्षण पूर्ण व्हावे आणि त्यांनी आयुष्यात स्वतःच्या पायावर उभे राहावे, ही प्रत्येक आईची इच्छा असते. त्याचबरोबर पतीच्या आजारपणाच्या काळात कुटुंबाला सावरण्याची जबाबदारीही त्यांच्यावर होती. अशा परिस्थितीत स्वतःला सावरत कुटुंबासाठी उभे राहणे, हे त्यांच्या जिद्दीचे दर्शन घडवते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.