

नालासोपाऱ्यात अग्नितांडव; दोन महिलांचा मृत्यू
पाच जणांची मृत्यूच्या दाढेतून सुटका
नालासोपारा, ता. १४ (बातमीदार) : नालासोपारा-वसई लिंक रोडवरील इम्पेरियल हाइट्स या इमारतीच्या १३व्या मजल्यावरील घरात लागलेल्या आगीचा भडका उडून ती सातव्या मजल्यापर्यंत पोहोचली. या अग्नितांडवातून ३० ते ४० जणांनी जीव मुठीत घेऊन सैरावैरा धावत स्वतःचा जीव वाचवला. पाच जणांची २५ मिनिटांच्या संघर्षानंतर मृत्यूच्या दाढेतून सुटका करण्यात आली; मात्र
दोन महिलांचा होरपळून मृत्यू झाला. मंगळवार (ता. १३) रात्री साडेअकरा वाजता लागलेली आग पालिकेच्या अग्निशमन दलाने पाच तास शर्थीचे प्रयत्न करून सकाळी ५ वाजता आटोक्यात आणली.
फाल्गुनी शाह आणि अश्विनी पारकर असे मृत्यू झालेल्या महिलांची नावे आहेत. इम्पेरियल हाइट्स ही इमारत १४ मजल्यांची आहे. मागच्या पाच वर्षांपूर्वीच ही इमारत उभी राहिलेली आहे. आगीचा माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. आगीची तीव्रता अधिक असल्यामुळे धुराच्या कल्लोळात अनेक रहिवासी इमारतीत अडकून पडले होते. यादरम्यान ११व्या मजल्यावर एकाच कुटुंबातील चार जण अडकले होते. अग्निशमन दलाने क्रेनच्या सहाय्याने बचावकार्य करीत या चौघांची सुखरूप सुटका केली. सुमारे ४० ते ४५ मिनिटे मदतीच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांना अखेर सुरक्षित बाहेर काढण्यात प्रशासनाला यश आले. या दुर्घटनेत सहा जण धुरामुळे गुदमरले असून, त्यांच्यावर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
घटनेची गंभीर दखल घेत महापालिका आयुक्त पृथ्वीराज बी. पी., स्थानिक आमदार स्नेहा दुबे-पंडित, महापौर अजीव पाटील, माजी महापौर रूपेश जाधव यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. या संपूर्ण बचावकार्यात अग्निशमन दल आणि प्रशासनाने २३पेक्षा अधिक नागरिकांची सुखरूप सुटका केली. घटनेची सखोल चौकशी सुरू असल्याचे महापालिका आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी सांगितले.
...
२५ मिनिटे मृत्यूशी झुंज
एकाच कुटुंबातील पाच जण चक्क खिडकीचे ग्रील तोडून साडीचा सहारा घेत ११व्या मजल्याच्या सज्ज्यावर येऊन थांबले होते. वर आगीचे तांडव आणि खाली १०० फूट खोली अशा मृत्यूच्या दारात अडकलेल्या कुटुंबांनी २५ मिनिटे मृत्यूशी झुंज दिली. शेवटी महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी या पाचही नागरिकांची सुखरूप सुटका केली आणि त्यांनी सुटकेचा श्वास घेतला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.