मालाड-मार्वे रोड बनला मृत्यूचा सापळा

मालाड-मार्वे रोड बनला मृत्यूचा सापळा
Published on: 

मालाड-मार्वे रोड बनला मृत्यूचा सापळा
दोन दिवसांत एकाचा मृत्यू, ज्येष्ठ महिला गंभीर
मालाड, ता. १५ (बातमीदार) : मालाड पश्चिमेतील मार्वे रोडवर भरधाव वाहनांमुळे अपघातांचे सत्र सुरू असून, अवघ्या दोन दिवसांत एका तरुणाचा मृत्यू, तर एका ज्येष्ठ महिलेला गंभीर दुखापत झाली आहे. राठोडी परिसरातील या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, रस्त्यावर पुन्हा गतिरोधक बसवण्याची मागणी जोर धरत आहे.
१० ऑक्टोबर रोजी कमल तलाव, राठोडी येथे भरधाव बेस्ट बसच्या चाकाखाली आल्याने एका तरुणाचा मृत्यू झाला. त्यानंतर १२ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ ते ८च्या दरम्यान रस्ता ओलांडणाऱ्या बेनी (वय ६७) या ज्येष्ठ महिलेला मार्वेच्या दिशेने जाणाऱ्या अज्ञात रिक्षाने धडक दिली. धडकेनंतर चालकाने घटनास्थळावरून पळ काढला. या अपघातात बेनी यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून, पायाचे हाडही मोडले आहे.
बेनी या एकल महिला असून, त्यांची मुले कामानिमित्त परदेशात आहेत. अपघाताची माहिती मिळताच शेजाऱ्यांनी त्यांना मालाड पश्चिमेतील खासगी रुग्णालयात दाखल केले. सध्या शेजारीच त्यांची देखभाल करत असल्याची माहिती स्थानिक रहिवासी जेस्सी कोएल्हो यांनी दिली.
महापालिकेने तातडीने गतिरोधक पुन्हा बसवावेत. बेदरकारपणे वाहन चालवणाऱ्यांवर परिवहन विभाग आणि स्थानिक पोलिसांनी कायदेशीर कारवाई करावी. अपघातांत जखमी झालेल्यांना आणि मृतांच्या कुटुंबीयांना महापालिका व शासनाने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी जेस्सी कोएल्हो यांनी केली.

गतिरोधक हटवल्याने अपघातांचा धोका
गणेशोत्सवातील मोठ्या मूर्तींच्या विसर्जनासाठी अडथळा होऊ नये म्हणून मार्वे रोडवरील काही ठिकाणचे गतिरोधक महापालिकेने हटवले होते, मात्र ते अद्याप पुन्हा बसवण्यात आले नसल्याने मालाड ते मार्वे आणि मार्वे ते मालाडदरम्यान वाहनांचा वेग वाढत असल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. वाहनांच्या वेगावर नियंत्रण आणण्यासाठी गतिरोधक तातडीने बसवावेत, अशी मागणी करणारे पत्रही नागरिकांनी महापालिकेला दिले आहे.

अपघातप्रवण ठिकाणांकडे दुर्लक्ष
मार्वे टी-जंक्शन, कमल तलाव, मालवणी क्रमांक १ आणि खारोडी हे परिसर अपघातप्रवण ठरत असल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे. या भागांत डम्पर, बेस्ट बस, टेम्पो, सिमेंट मिक्सर आणि दुचाकींच्या धडकेत पादचारी जखमी होण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. यात लहान मुले, शालेय विद्यार्थी, महिला आणि पुरुषांचा समावेश असल्याचे स्थानिकांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com