

सत्ताधाऱ्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न
राहुल गांधी आणि इंडिया आघाडीवर एकनाथ शिंदे यांची टीका
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १६ : ‘‘सत्ता गेल्याने विरोधकांचा संयम सुटला असून, सरकारला बदनाम करण्यासाठी घटनात्मक संस्थांवरच अविश्वास निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पाण्याविना मासा जसा तडफडतो, तसे हे लोक सत्तेविना तडफडत आहेत,’’ अशा शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि इंडिया आघाडीवर आज टीका केली. जनतेने सत्ता दिली नसल्याने विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
सरकारच्या धोरणांवर आणि निर्णयांवर टीका करण्याचा अधिकार विरोधकांना आहे; मात्र टीकेच्या नावाखाली घटनात्मक संस्थांविषयी जनतेच्या मनात अविश्वास निर्माण करणे लोकशाहीसाठी योग्य नाही, अशी भूमिका शिंदे यांनी मांडली. न्यायव्यवस्थेवर दबाव आणण्याचे प्रयत्न होत असल्याचा आरोप करत, देशात अराजकता निर्माण करण्याचे प्रयत्न जनता यशस्वी होऊ देणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
राहुल गांधी यांच्या विधानांचा पाकिस्तानमध्ये उल्लेख होत असल्याचा मुद्दा उपस्थित करत शिंदे यांनी विरोधकांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. देशप्रेमाचा दावा करायचा आणि त्याच वेळी देशात अस्थिरता निर्माण होईल, अशी परिस्थिती निर्माण करायची, याला देशभक्ती कसे म्हणायचे, असा सवाल त्यांनी केला. देशहितापेक्षा राजकीय स्वार्थाला प्राधान्य दिले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.
भारताची तुलना नेपाळ, श्रीलंका किंवा बांगलादेशाशी करता येणार नाही. भारत सक्षम आणि शक्तिशाली देश असून, देशात अस्थिरता निर्माण करण्याचे प्रयत्न जनता हाणून पाडेल, असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला. देशहिताला प्राधान्य देणे हीच शिवसेनेची भूमिका असून, विकासाच्या बळावर जनता सरकारच्या पाठीशी उभी राहील, विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बोलताना शिंदे यांनी महायुती पाचही जागा जिंकेल, असा दावा केला.
आनंद दुबेंमुळे राष्ट्रीय विस्ताराला चालना
‘‘गेल्या अनेक वर्षांपासून आनंद दुबे यांना शिवसेनेत काम करताना पाहत आहे. राष्ट्रीय स्तरावर माध्यमांशी संवाद साधणे, पक्षाची भूमिका मांडणे आणि विचारधारा लोकांपर्यंत पोहोचविण्याचे काम त्यांनी केले आहे. राष्ट्रीय प्रवक्ते म्हणून काम केलेले आनंद दुबे यांनी अनेक सहकाऱ्यांसह शिवसेनेत प्रवेश केला. या प्रवेशामुळे पक्षाच्या राष्ट्रीय स्तरावरील विस्ताराला चालना मिळेल, बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आणि शिवसेनेची कार्यपद्धती त्यांना माहिती आहे. त्यामुळे त्यांच्या अनुभवाचा पक्षाला फायदा होईल,’’ असे शिंदे यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.