

कल्याणात मतचोरीविरुद्ध जनआक्रोश मोर्चा
मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी
कल्याण, ता. १६ (वार्ताहर) : निवडणूक प्रक्रियेतील कथित अनियमिततेच्या निषेधार्थ आणि मतचोरीच्या आरोपावरून शुक्रवारी (ता. १६) कल्याणमध्ये महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीच्या वतीने जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. साई चौक परिसरातून सुरू झालेला मोर्चा खडकपाडामार्गे प्रांत कार्यालयावर नेण्यात आला. या वेळी निवडणूक आयोग आणि मोदी सरकारविरोधात घोषणाबाजी करीत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली.
शिवसेना (ठाकरे गट), काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार), महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यासह विविध विरोधी पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते या मोर्चात सहभागी झाले होते. यामध्ये काँग्रेसचे ठाणे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह पवार, कल्याण जिल्हाध्यक्ष नवीन सिंग, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रवक्ते महेश तपासे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख अल्पेश भोईर, मनसेचे माजी आमदार प्रकाश भोईर, जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर यांच्यासह इतर अनेक पदाधिकारी सहभागी झाले. निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता राखून मतदारांच्या मतदानाच्या अधिकारांचे संरक्षण करावे, अशी भूमिका आंदोलकांनी मांडली.
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा घ्यावा, त्यांच्यावर कारवाई करून कथित षड्यंत्रातील संबंधितांना अटक करावी, अशी मागणी आंदोलकांनी केली. तसेच मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाची (एसआयआर) प्रक्रिया रद्द करावी आणि आगामी निवडणुका ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरवर घ्याव्यात, अशी मागणीही या वेळी करण्यात आली.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पेपरफुटी प्रकरणावरून आयोगाच्या अध्यक्षांचा राजीनामा घेऊन संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही आंदोलकांनी केली. मतदारांच्या हक्कांचे संरक्षण, निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता आणि विविध जनहिताच्या प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.