

दसऱ्याच्या तोंडावर झेंडू महागला
भाव २०० रुपयांपार जाण्याची शक्यता; ग्राहकांच्या खिशाला झळ
जीवन तांबे ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १८ ः सणासुदीच्या काळात झेंडूच्या फुलांच्या भावात मोठी चढ-उतार पाहायला मिळत आहे. गणेशोत्सवाच्या काळात किलोमागे २०० रुपयांचा टप्पा गाठणारा झेंडू नवरात्रोत्सवाच्या सुरुवातीला ३० ते ४० रुपयांपर्यंत घसरला होता, मात्र आता दसऱ्याच्या तोंडावर दादरच्या फूल बाजारात झेंडूचा भाव पुन्हा वाढून १६० रुपये किलोवर पोहोचला आहे. दसऱ्याच्या दिवशी फुलांची मागणी वाढल्यास झेंडूचे भाव २०० रुपयांपार जाण्याची शक्यता विक्रेत्यांकडून व्यक्त केली जात आहे.
महाराष्ट्रात गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, दसरा आणि दिवाळी या सणांना विशेष महत्त्व आहे. या सणांमध्ये पूजाअर्चा, सजावट आणि धार्मिक परंपरांसाठी फुलांना मोठी मागणी असते. त्यातही दसरा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक महत्त्वाचा मुहूर्त मानला जात असल्याने झेंडूच्या फुलांना विशेष पसंती दिली जाते. घरोघरी पूजा, वाहनांची सजावट, दुकानांना तोरणे लावणे तसेच विविध धार्मिक कार्यक्रमांसाठी झेंडूची खरेदी केली जाते.
दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर दादर फूल बाजारात फुलांची खरेदी-विक्री वाढण्याची चिन्हे आहेत. जुन्नर, नाशिक, सातारा, कोल्हापूर, सांगली यांसह राज्यातील विविध भागांतून बाजारात फुलांची आवक होत आहे. गणेशोत्सवात झेंडूचे भाव २०० रुपयांपार गेल्याने विक्रेत्यांचा चांगला व्यवसाय झाला होता. त्यानंतर नवरात्रोत्सवाच्या सुरुवातीला आवक वाढल्याने भावात मोठी घसरण झाली. त्यामुळे ग्राहकांना स्वस्त भावात फुले खरेदी करता आली.
नवरात्रोत्सवाचा शेवटचा टप्पा आणि दसरा जवळ येताच झेंडूच्या भावात पुन्हा वाढ होऊ लागली आहे. दसऱ्याच्या दिवशी मागणी वाढल्यास भाव आणखी वाढण्याची शक्यता आहे. विशेषतः मागणीच्या तुलनेत आवक कमी राहिल्यास किलोमागे २०० रुपयांचा टप्पा ओलांडला जाऊ शकतो. त्यामुळे सणासाठी फुलांची खरेदी करणाऱ्या सर्वसामान्य ग्राहकांना अधिक पैसे मोजावे लागण्याची शक्यता आहे.
दसरा आणि नवरात्रोत्सव हा फूल उत्पादक शेतकरी तसेच विक्रेत्यांसाठी उत्पन्नाच्या दृष्टीने महत्त्वाचा काळ असतो. यंदा सध्या पावसाचे संकट नसल्याने फुलांच्या व्यवसायाला दिलासा मिळाल्याचे चित्र आहे, मात्र आगामी काळात भाव किती वाढतात, याकडे शेतकरी, विक्रेते आणि ग्राहकांचे लक्ष लागले आहे. सणाचा उत्साह वाढत असतानाच झेंडूच्या वाढत्या भावामुळे ग्राहकांच्या खिशाला मात्र झळ बसण्याची शक्यता आहे.
बाजारातील मागणी आणि आवक यावर भाव अवलंबून असतात. दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर झेंडूचा भाव वाढणार आहे. त्यामुळे उत्पादन खर्च भरून निघेल आणि उत्पादकाच्या हातात चार पैसे शिल्लक राहतील.
- सुशिला कोणकर, झेंडू उत्पादक
काही दिवसांपूर्वी ३० ते ४० रुपये किलो मिळणारा झेंडू आता १६० रुपयांवर पोहोचला आहे. सणासुदीच्या काळात फुलांचे भाव वाढल्याने सर्वसामान्यांच्या खर्चात भर पडत आहे. त्यामुळे सण साजरा करताना खरेदीचे बजेट सांभाळावे लागत आहे.
- लक्ष्मी पुजारी, ग्राहक,
शेवंती- ४०० रुपये किलो
झेंडू - १६० रुपये किलो
मोगरा - १,२०० रुपये किलो
अबोली - १,६०० रुपये किलो
चमेली - १,२०० रुपये किलो
जुई - १,२०० रुपये किलो
तोरण एक नग ४० रुपये
साधी वेणी एक नग ३० रुपये
टगर १२० रुपये किलो
गुलाब सुटे ३२० रुपये किलो
भात एक नग १० रुपये
कमळ ६० रुपये
आपटे पाने ५० रुपये
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.