सोन्याच्या दरांनी बजेट बिघडवले

सोन्याच्या दरांनी बजेट बिघडवले
Published on: 

सोन्याच्या दरांनी बजेट बिघडवले
दिवाळीच्या खरेदीवर महागाईचे सावट; दर घसरण्याच्या प्रतीक्षेत ग्राहक
तुर्भे, ता. १९ (बातमीदार) : दसरा-दिवाळीच्या मुहूर्तावर सोनेखरेदी करणे शुभ मानले जाते, मात्र यंदा सोन्याचे दर वाढल्याने ग्राहकांना खरेदीपूर्वी आर्थिक नियोजन करावे लागत आहे. दरात काहीशी नरमाई दिसत असली, तरी सोने सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरच असल्याची भावना ग्राहकांमध्ये आहे. त्यामुळे अनेकांनी दागिन्यांची खरेदी मर्यादित ठेवली असून, काही ग्राहक दर आणखी कमी होण्याच्या प्रतीक्षेत आहेत. परिणामी, सराफा बाजारात सणासुदीचा उत्साह असला, तरी खरेदीबाबत सावधगिरी दिसत आहे.
ऑगस्टच्या अखेरीस सणासुदीच्या खरेदीला सुरुवात झाल्यानंतर सोन्याच्या दागिन्यांना चांगली मागणी होती, मात्र त्यानंतर दरात झालेली मोठी वाढ आणि चढ-उतार यांचा ग्राहकांच्या निर्णयावर परिणाम झाला. लग्नसराई, कौटुंबिक समारंभ आणि भविष्यातील गरजांसाठी सोने घेणाऱ्यांची बाजारात वर्दळ असली, तरी केवळ सणानिमित्त खरेदी करणारे ग्राहक दर स्थिर होण्याची वाट पाहत आहेत. आवडीचे दागिने घेण्याची इच्छा आणि मर्यादित बजेट यांचा मेळ घालण्याची कसरत त्यांना करावी लागत आहे.
आगामी दिवाळी आणि लग्नसराईच्या पार्श्वभूमीवर सोने-चांदीच्या खरेदीत वाढ होईल, अशी अपेक्षा सराफा व्यावसायिकांना आहे. वाढत्या किमतींमुळे काही ग्राहक हलक्या वजनाचे दागिने, तर काही सोन्याची नाणी किंवा बिस्किटे खरेदी करण्याला प्राधान्य देत आहेत. त्यामुळे ग्राहकांच्या पसंतीतही बदल होत आहे.
दागिन्यांच्या किमतीत घडणावळ, लागू कर आणि इतर शुल्कांची भर पडत असल्याने प्रत्यक्ष खरेदीचा खर्च आणखी वाढतो. त्यामुळे सणाच्या मुहूर्तावर सोने खरेदीची परंपरा जपत असताना ग्राहकांना यंदा खर्चाचे गणित जुळवावे लागत आहे.

नवी मुंबईत सहाशेहून अधिक सराफा दुकाने
बेलापूरपासून दिघ्यापर्यंत नवी मुंबई महापालिका क्षेत्रात अंदाजे सहाशेहून अधिक सराफा दुकाने आहेत. सार्वजनिक सुट्ट्या वगळता दररोज सोन्या-चांदीचे दर जाहीर केले जातात. सणासुदीनिमित्त या दुकानांमध्ये पारंपरिक दागिन्यांसह आधुनिक डिझाइनचे अलंकारही उपलब्ध आहेत, मात्र वाढलेल्या किमतींमुळे दागिन्यांचे वजन, डिझाइन आणि एकूण खर्च यांचा ताळमेळ साधण्यावर ग्राहकांचा भर आहे. त्यामुळे यंदा शुभमुहूर्ताबरोबरच दर आणि आर्थिक नियोजनालाही महत्त्व आले आहे.

खारघरमध्ये घडणावळीवर ५० टक्क्यांपर्यंत सूट
खारघर (बातमीदार) ः खारघरमधील ५५ हून अधिक सराफा दुकानांत दसऱ्यानिमित्त विशेष ऑफर्स जाहीर करण्यात आल्या आहेत. सोन्याच्या दागिन्यांच्या घडणावळीवर ४० ते ५० टक्क्यांपर्यंत सवलत दिली जात आहे. हलके दागिने, नेकलेस सेट, पाटल्या आणि बांगड्यांना ग्राहकांची पसंती मिळत आहे. काही सराफांनी सोन्याच्या नाण्यांसाठी नोंदणी ऑफरही सुरू केली आहे. या सवलतींमुळे सणासुदीच्या खरेदीला चालना मिळण्याची अपेक्षा सराफा व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे.

१९ ऑक्टोबरचे सोने-चांदीचे दर
प्रकार दर
२४ कॅरेट सोने (१० ग्रॅम) ₹१,४७,६५०
२२ कॅरेट सोने (१० ग्रॅम) ₹१,३५,३४०
चांदी (१ किलो) ₹२,१२,६१०

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com