चैत्यभूमीवर विचारांचा जागर

चैत्यभूमीवर विचारांचा जागर
Published on: 

चैत्यभूमीवर विचारांचा जागर
धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त आंबेडकरी साहित्य, संविधानाच्या पुस्तकांना विशेष मागणी
जीवन तांबे ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २० : धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दादर येथील चैत्यभूमीवर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी आज (ता. २०) सकाळपासून हजारो आंबेडकरी अनुयायांनी गर्दी केली होती. दिवसभरात एक लाखाहून अधिक अनुयायांनी चैत्यभूमीला हजेरी लावली. बाबासाहेबांना अभिवादन केल्यानंतर अनेकांनी पुस्तक खरेदीकडे मोर्चा वळवल्याचे चित्र होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ ऑक्टोबर १९५६ला नागपूर येथे बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. या ऐतिहासिक घटनेच्या स्मरणार्थ दरवर्षी धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा करण्यात येतो. चैत्यभूमी परिसरात आकर्षक पुष्पसजावट करण्यात आली होती. सकाळी ९.१५ वाजता ध्वजारोहण करण्यात आले. बौद्धजन पंचायत समितीचे सभापती आनंदराज आंबेडकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
मुंबई महापालिका प्रशासन आणि पोलिसांकडून आवश्यक सुविधा, वाहतूक नियंत्रण आणि सुरक्षेच्या दृष्टीने बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पिण्याच्या पाण्यासह अन्य सुविधाही उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. चैत्यभूमी परिसरात ३०० हून अधिक समता सैनिक दलाचे स्वयंसेवक आणि पोलिस तैनात करण्यात आले होते. उत्तर विभागातील प्रशासनाकडूनही आवश्यक व्यवस्था करण्यात आल्याचे चैत्यभूमीचे व्यवस्थापक प्रदीप कांबळे यांनी सांगितले.

आंबेडकरी साहित्याला मागणी
चैत्यभूमी परिसरातील पुस्तक स्टॉलवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार, बौद्ध धम्म आणि भारतीय संविधानाविषयीचे साहित्य खरेदी करण्यासाठी अनुयायांनी गर्दी केली होती. ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’, भारतीय संविधान तसेच डॉ. आंबेडकर यांच्या जीवनकार्यावर आधारित विविध पुस्तकांना विशेष मागणी होती. मागणी वाढल्यामुळे अनेक पुस्तकांच्या प्रति संपल्याचे विक्रेत्यांनी सांगीतले.

आंबेडकरी साहित्यापासून ते संविधानापर्यंत अनेक पुस्तकांना मागणी होती. काही पुस्तकांचा साठा संपला. तरुण वाचकांची पुस्तक खरेदीचा उस्ताह वाखाण्याजोगा आहे.
- अनिल खैरे, पुस्तक विक्रेते

चैत्यभूमीवर बाबासाहेबांना अभिवादन करण्याकरिता दरवर्षी येते. आपल्या मुलांनाही वाचनाची आवड लागावी म्हणून पुस्तके खरेदी करते.
- मीनाक्षी म्हात्रे, अनुयायी

आजच्या तरुण पिढीने सोशल मीडियावर वेळ घालवण्याबरोबरच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ग्रंथ वाचले पाहिजेत. चैत्यभूमीवर पुस्तकांची दुकाने पाहिल्यानंतर अनेकांना पुस्तके खरेदी करण्याची प्रेरणा मिळते.
- सक्षम कदम, विद्यार्थी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com