

सत्तापालटासाठी उभा ठाकलोय!
उद्धव ठाकरे यांचा सरकारवर हल्लाबोल
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २० : केंद्रातील भाजप सरकारने निवडणूक आयोगाला हाताशी धरून मतचोरीचा सपाटा लावला आहे. त्या माध्यमातूनच निवडणुका जिंकण्याचा धंदा भाजप करीत आहे. त्याविरोधात जेन-झीसह आम्हीही रस्त्यावर उतरलो आहोत. होय, आम्ही सत्ता बदलासाठीच उभे ठाकलो आहोत, असा हल्लाबोल आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यात केला. मतदारांनी केलेल्या मताची चोरी होत असेल तर रेजीम का चेंज करायचा नाही, असा सवालही त्यांनी केला.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा दसरा मेळावा आज शिवाजी पार्क मैदानात पार पडला. या वेळी शिवसैनिकांना मार्गदर्शन करताना उद्धव ठाकरे यांनी भाजपसह केंद्र सरकार, निवडणूक आयोगासह पोलिसांच्या मनमानी कारभाराविरोधात जोरदार फटकेबाजी केली. देशातील तरुण जागा झाला आहे. तो मोदी-शहांच्या दंडुकेशाहीला न घाबरता जेन-झीसह जनता रस्त्यावर उतरत आहे. त्यामुळे नक्कीच अच्छे दिन येतील; पण त्यासाठी हिमतीने लढा द्यावा लागेल. या लढ्यात महाराष्ट्र भवानीमातेच्या तलवारीसारखा तळपायला हवा, असे आवाहनही उद्धव ठाकरे यांनी केले.
अभिजित दीपके यांना पाठिंबा असल्याचा पुनरुच्चार उद्धव ठाकरे यांनी या वेळी केला. मोदी सरकार सत्तेत आल्यापासून त्यांनी केलेल्या घोषणेप्रमाणे देश मतचोरी आणि दानचोरीत आत्मनिर्भर झाला असल्याची टीका त्यांनी केली. पेपरफुटीविरोधात आंदोलन करताच केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला, महाराष्ट्रात भीमनवार रजेवर गेले. मग मतचोरी करणारा ज्ञानेशकुमार का जात नाही, त्याच्यामध्ये सरकारचा जीव अडकलाय का, असे सवाल ठाकरे यांनी केले. या वेळी शिवसेना नेते आदित्य ठाकरे, दिवाकर रावते, सुभाष देसाई, खासदार अनिल देसाई, अरविंद सावंत, आमदार भास्कर जाधव सुषमा अंधारे, नितीन बानगुडे पाटील आदी उपस्थित होते.
...
भाजपचा सर्वात मोठा ‘संभ्रम घोटाळा’
भाजपने गेल्या १२ वर्षांत देशात अनेक घोटाळे केले असून, त्यापैकी संभ्रम घोटाळा हा सर्वांत मोठा असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगतानाच त्यांची पोलखोल केली. वेगवेगळ्या प्रकारे ते संभ्रम पसरवून जनतेला भुलवून मते मिळवतात, हाच त्यांचा निवडणुका जिंकण्याचा धंदा असल्याची टीकाही उद्धव ठाकरे यांनी केली.
...
मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राची बदनामी थांबवावी
महाराष्ट्र शहरी नक्षली चळवळीचे केंद्र बनत असल्याचे राज्य सरकारने एका प्रकरणात उच्च न्यायालयात सांगितले आहे. त्यावरून उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना लक्ष केले. सुसंस्कृत महाराष्ट्र आहे. याच महाराष्ट्रातून अनेक चळवळी उभा राहिल्या; समजसुधारक, क्रांतिकारक निर्माण झाले आहेत. वेगवेगळ्या टप्प्यांवर न्याय मिळत नसल्याने नागरिकांकडून आंदोलन केले जात आहे. त्यांना शहरी नक्षलवादी म्हणताना तुमची जीभ झडत कशी नाही, असा सवाल ठाकरे यांनी केला. तसेच मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राला कलंकित करणे थांबवावे, असेही बजावले.
...
भागवतांनी आंदोलकांना सभ्यता शिकवू नये
आंदोलन करताना आंदोलकांनी सभ्यता पाळायला हवी, असे आरएसएसचे प्रमुख मोहन भागवत यांनी म्हटले आहे. त्याबाबत बोलताना भागवतांनी आंदोलकांना सभ्यता शिकवू नये, असे ठणकावले. तिरंगा फडकवणाऱ्या तरुणांच्या अंगावर पोलिस आणि सत्ताधारी लांडग्याप्रमाणे जात आहेत, ते तुम्हाला दिसत नाही का, तिरंग्याला संघाचा विरोध होता तीच भूमिका आजही तुमची कायम आहे का, असे सवालही ठाकरे यांनी केले.
...
मोदींना फळे चाखावी लागणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी गेल्या बारा वर्षांत दडपशाही केली आहे. जनतेला छळले, आर्थिक वाट लावली, उद्योगधंदे बुडवले हे तुमचे बारा वर्षांचे संचित आहे. त्याविरोधात तरुणाई रस्त्यावर उतरली असून, त्याची फळे तुम्हाला चाखावी लागतील, असे उद्धव ठाकरे यांनी बजावले.
...
गद्दारांना ५० खोके, शेतकऱ्यांना पाच हजार
आपली सत्ता टिकवण्यासाठी मिंद्यांकडून फोडाफोडीचे राजकारण केले जात आहे. त्यासाठी गद्दारांना ५० खोके दिले; पण सरकार म्हणून शेतकऱ्यांना दिवाळीसाठी अवघे पाच हजार रुपये देताना लाज वाटत नाही का, असा सवाल राज्य सरकारला केला.
...
अमित शहा हेच लाॅरेन्स बिष्णोई - संजय राऊत
अभिनेता टायगर श्राॅफवर झालेल्या गोळीबाराची बिष्णोई गँगने जबाबदारी स्वीकारली आहे. त्याबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले, की लाॅरेन्स बिष्णोई अस्तित्वातच नाही; केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हेच लाॅरेन्स बिष्णोई आहेत. ते एक माफिया असून, त्यांची टोळी चालवत असल्याची टीका राऊत यांनी केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.