

कासा येथे संघाच्या पथसंचलनात ६५ स्वयंसेवकांचा सहभाग
डॉ. ज्ञानेश्वर भोसले यांचे विचारप्रवर्तक व्याख्यान; पंचपरिवर्तन संकल्पनेवर मार्गदर्शन
कासा बातमीदार
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त डहाणू तालुक्यातील कासा येथे आयोजित पथसंचलनात ६५ स्वयंसेवक सहभागी झाले. या पथसंचलनादरम्यान अनेक ठिकाणी विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि ग्रामस्थांनी पुष्पवृष्टी करून स्वयंसेवकांचे स्वागत केले. यानिमित्त कासा केंद्रात आयोजित कार्यक्रमात प्रा. डॉ. ज्ञानेश्वर भोसले यांनी व्याख्यानातून संघाचे कार्य, भारतीय संस्कृती, राष्ट्रीय अस्मिता आणि सामाजिक परिवर्तन यांविषयी विचार मांडले.
संघाच्या शताब्दी वर्षाच्या पार्श्वभूमीवर डॉ. भोसले यांनी संघाच्या कार्याचा आढावा घेत समाजजीवनात एकात्मता, बंधुभाव आणि सेवाभाव रुजवण्याचे महत्त्व स्पष्ट केले. वारकरी संतसाहित्याचा संदर्भ देत त्यांनी सामाजिक समरसता, लोककल्याण आणि समाजातील सर्व घटकांना जोडणाऱ्या मूल्यांचे महत्त्व अधोरेखित केले.
या वेळी त्यांनी संघाच्या पंचपरिवर्तन संकल्पनेतील सामाजिक समरसता, कुटुंब प्रबोधन, पर्यावरण संरक्षण, स्वदेशी आचरण आणि नागरिक कर्तव्य या पाच विषयांचे विवेचन केले. समाजातील भेदभाव दूर करून परस्परांमध्ये प्रेम व विश्वास निर्माण करणे, कुटुंबव्यवस्थेतील संस्कार जपणे, पर्यावरणाचे संरक्षण करणे आणि प्रत्येक नागरिकाने आपली जबाबदारी पार पाडणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
शाखेतील कार्याबरोबरच समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचणारे संपर्ककार्यही महत्त्वाचे आहे. कुटुंबांशी वैयक्तिक संवाद साधल्याने जिव्हाळा आणि सामाजिक विश्वास वाढतो. स्वयंसेवकांनी समाजातील सुख-दुःखात सहभागी व्हावे, संकटसमयी मदतीसाठी पुढाकार घ्यावा, युवकांमध्ये चांगले संस्कार रुजवावेत आणि व्यसनमुक्त समाजनिर्मितीसाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले.
राष्ट्रनिर्मिती ही केवळ शासनाची किंवा एखाद्या संघटनेची जबाबदारी नसून, प्रत्येक नागरिकाच्या आचरणातून आणि सामाजिक सहभागातून घडणारी प्रक्रिया आहे, असा संदेश डॉ. भोसले यांनी आपल्या व्याख्यानातून दिला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.