चासोळेतील घरपट्टी घोटाळा

चासोळेतील घरपट्टी घोटाळा
Published on: 

मुरलीधर दळवी : सकाळ वृत्तसेवा
मुरबाड, ता. २२ : काळू धरणाच्या बुडीत क्षेत्रातील चासोळे ग्रामपंचायत हद्दीत अस्तित्वात नसलेल्या मालमत्तांची घरपट्टी आकारल्याच्या कथित प्रकरणात ग्रामपंचायत अधिकारी सीमा संतोष म्हाडसे यांना सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. तसेच संगणक चालकाला कामावरून कमी करण्याची कार्यवाही करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. ग्रामपंचायत शिपायाविरोधात निलंबन किंवा बडतर्फीची कारवाई करण्याबाबत ग्रामपंचायतीला कळविण्यात आले आहे. या प्रकरणामुळे मुरबाड तालुक्यात खळबळ उडाली आहे.

मुंबईला पाणीपुरवठा करण्यासाठी मुरबाड तालुक्यातील काळू नदीवर धरण बांधण्याचे प्रस्तावित आहे. या प्रकल्पामुळे चासोळे ग्रामपंचायत हद्दीतील घरे आणि शेती पाण्याखाली जाणार आहेत. धरणामुळे बाधित होणाऱ्या घरांना नुकसानभरपाई मिळते, तसेच बाधित कुटुंबांतील तरुणांना नोकरीची संधी मिळू शकते. या लाभांसाठी चासोळे ग्रामपंचायत हद्दीत सुमारे ३०० बोगस घरपट्ट्या तयार करण्यात आल्याच्या तक्रारी आहेत. या प्रकरणात लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याची चर्चाही परिसरात सुरू आहे.
या कथित गैरव्यवहाराची चौकशी करून कारवाईच्या मागणीसाठी अरुण राऊत यांनी १५ ऑक्टोबरपासून ठाणे येथे बेमुदत उपोषण सुरू केले होते. त्यानंतर ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रणजीत यादव यांनी १९ ऑक्टोबरच्या आदेशानुसार ग्रामपंचायत अधिकारी सीमा म्हाडसे यांना निलंबित केले. चासोळे ग्रामपंचायतीत कार्यरत असताना कथित गैरवर्तन केल्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध विभागीय चौकशी प्रस्तावित करण्यात आली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी यादव यांनी अरुण राऊत यांना दिलेल्या पत्रात पुढील कार्यवाहीची माहिती दिली आहे.

कारवाईचा सपाटा
चासोळेच्या सरपंच इंदुमती मेंगाळ यांची ठाणे येथे चौकशी सुरू असून, त्यांच्यावरील पुढील कारवाईचा प्रस्ताव कोकण विभागाच्या विभागीय आयुक्तांकडे पाठविण्याची प्रक्रिया सुरू आहे. संगणक चालक शुभम थोरात यांना कामावरून कमी करण्यासाठी कार्यवाही करण्याचे निर्देश मुरबाड पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. ग्रामपंचायत शिपाई संतोष राऊत यांच्याविरोधात निलंबन किंवा बडतर्फीची कारवाई करण्याचे अधिकार ग्रामपंचायतीला असल्याने त्याबाबत ग्रामपंचायतीला कळविण्यात आले आहे.

३०४ मालमत्ता प्रत्यक्ष जागेवर नाहीत!
मुरबाड पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी सादर केलेल्या अहवालानुसार, चासोळे ग्रामपंचायतीतील घरपट्टी आकारणी आणि नमुना क्रमांक आठमधील नोंदींची प्रत्यक्ष तपासणी करण्यात आली. या तपासणीत ३०४ मालमत्ता प्रत्यक्ष जागेवर आढळल्या नाहीत. या मालमत्तांची करआकारणी करताना आवश्यक कागदपत्रांची पडताळणी, प्रत्यक्ष स्थळपाहणी, मालमत्तांचे मोजमाप आणि इतर आवश्यक शहानिशा करण्यात आली होती किंवा नाही, याची सखोल चौकशी होणे आवश्यक असल्याचे अहवालात नमूद केले आहे.

अन्य ग्रामपंचायतींच्या चौकशीची मागणी
चासोळे ग्रामपंचायतीप्रमाणेच काळू धरणाच्या बुडीत क्षेत्रातील भोरंडे, भोईरवाडी आणि दिघेफळ यांसह अन्य ग्रामपंचायतींमध्येही बोगस घरपट्ट्यांचे प्रकार झाल्याचा दावा करण्यात येत आहे. या सर्व ग्रामपंचायतींमधील घरपट्टी नोंदींची सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com