ठाणे जिल्ह्यात रविवारी १५ हजार ६१५ नवसाक्षरांची मूल्यमापन चाचणी

ठाणे जिल्ह्यात रविवारी १५ हजार ६१५ नवसाक्षरांची मूल्यमापन चाचणी
Published on: 

ठाणे जिल्ह्यात १५ हजार नवसाक्षरांची चाचणी
१,३८१ केंद्रांवर रविवारी आयोजन; उल्लास नवभारत साक्षरता अभियानांतर्गत नियोजन पूर्ण

ठाणे, ता. २४ : उल्हास नवभारत साक्षरता अभियानांतर्गत ठाणे जिल्ह्यात रविवारी (ता. २५) १५ हजार ६१५ नवसाक्षरांची पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी घेण्यात येणार आहे. जिल्ह्यातील पाच तालुके आणि सहा पालिका क्षेत्रांतील परीक्षार्थींसाठी एकूण १,३८१ परीक्षा केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत ही चाचणी होणार आहे.
जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांच्या मार्गदर्शनाखाली परीक्षेचे नियोजन करण्यात आले आहे. परीक्षेच्या कामकाजावर देखरेख ठेवण्यासाठी बालभारती, पुणे येथील शिक्षण सहसंचालक अनुराधा ओक या राज्यस्तरीय निरीक्षक म्हणून जिल्ह्याला भेट देणार आहेत.
प्रश्नपत्रिका सोडविण्यासाठी तीन तासांचा अवधी देण्यात येणार असून, दिव्यांग परीक्षार्थींना एक तासाची अतिरिक्त सवलत देण्यात आली आहे. उल्हास ॲपवर नोंदणी केलेल्या तसेच साक्षरता वर्गांच्या माध्यमातून साक्षर झालेल्या नवसाक्षरांनी जवळच्या निश्चित परीक्षा केंद्रावर उपस्थित राहून चाचणीत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी (योजना) देवीदास पंडित महाजन आणि उपशिक्षणाधिकारी (योजना) विजयकुमार सोनवणे यांनी केले आहे.

नवी मुंबईत सर्वाधिक परीक्षार्थी
जिल्ह्यातील नियोजनानुसार, नवी मुंबई पालिका क्षेत्रात सर्वाधिक २,६३५ परीक्षार्थी असून, त्यांच्यासाठी १७७ परीक्षा केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. मिरा-भाईंदरमध्ये २,१७६, कल्याण पालिका क्षेत्रात २,००४, भिवंडी पंचायत समिती क्षेत्रात १,६०५, तर ठाणे यूआरसी-१ क्षेत्रात १,३९१ परीक्षार्थी चाचणी देणार आहेत. शहापूर १,४३२, ठाणे यूआरसी-२ - १,०५०, उल्हासनगर क्षेत्रात १,००९, भिवंडी-निजामपूर ९७५, अंबरनाथ पंचायत समिती क्षेत्रात ६६३, कल्याण पंचायत समिती क्षेत्रात ३७३ आणि मुरबाड पंचायत समिती क्षेत्रात ३०२ परीक्षार्थी सहभागी होणार आहेत.

वाचन, लेखन आणि संख्याज्ञानाचे मूल्यमापन
तालुकानिहाय नियोजन करून शाळांमध्ये परीक्षा केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. संबंधित शाळांचे मुख्याध्यापक केंद्रप्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळणार असून, परीक्षेचे सुरळीत आयोजन करण्यासाठी तालुका आणि पालिकानिहाय निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हा नोडल अधिकारी म्हणून डॉ. प्राजक्ता राऊत यांची नेमणूक करण्यात आली आहे.

Marathi News Esakal
www.esakal.com