साहित्याच्या मेजवानीने रंगले मुंबई लिटफेस्ट

साहित्याच्या मेजवानीने रंगले मुंबई लिटफेस्ट
Published on: 

साहित्याच्या मेजवानीने रंगले मुंबई लिटफेस्ट
गुलजार, जावेद अख्तर, शशी थरुरांसह दिग्गज साहित्यिकाची उपस्थिती
विनोद राऊत ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २५ : मुंबईतील एनसीपीए येथे नुकत्याच पार पडलेल्या गोदरेज लिटरेचर लाईव्ह! द मुंबई लिटफेस्टमध्ये पुस्तकप्रेमी आणि साहित्यप्रेमी मुंबईकरांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. तीन दिवस चाललेल्या या महोत्सवात जावेद अख्तर, गुलजार, शशी थरूर, शेफाली शाह आणि जेरी पिंटो यांच्यासह अनेक नामवंत लेखक व साहित्यिक सहभागी झाले होते.
मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते. क्रिकेट आणि मनोरंजन क्षेत्रातील मुंबईचे स्थान अधोरेखित आहे, मात्र असंख्य साहित्यिक, लेखक आणि प्रकाशकांचे वास्तव्य असूनही साहित्यविश्वात मुंबईला स्वतंत्र ओळख मिळाली नाही. ही ओळख निर्माण करण्याच्या उद्देशाने दिवंगत पत्रकार आणि लेखक अनिल धारकर यांच्या पुढाकारातून मुंबई लिट फेस्टची सुरुवात झाली. काही काळातच देशातील प्रमुख साहित्य महोत्सवांपैकी एक म्हणून या मुंबई लिटफेस्ट फेस्टिव्हलने आपले स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे.
यंदा २३ ते २५ ऑक्टोबरदरम्‍यान नरिमन पॉइंट येथील समुद्रकिनाऱ्यालगत असलेल्या एनसीपीएच्या सभागृहात साहित्य महोत्सव रंगला. तिन्ही दिवस साहित्यरसिकांसाठी प्रवेश मोफत होता. या लिटफेस्टमध्ये विविध विषयांवरील चर्चासत्र, पुस्तक प्रकाशनासोबत नव्या पुस्तकांवर परिसंवादही आयोजित करण्यात आले होते. विशेष म्हणजे, या परिसंवादात उपस्थितांना पाहुण्यांशी प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून थेट संवाद साधण्याची संधी मिळाली.
साहित्य महोत्सवाची सुरुवात जावेद अख्तर यांच्या ‘थ्री मास्टर्स’ या पुस्तकाच्या प्रकाशनाने झाली. यानिमित्ताने दिग्दर्शक सुमांत्रो घोषाल आणि अभिनेत्री जुही बब्बर यांनी जावेद अख्तर यांच्याशी संवाद साधला. दुसऱ्या दिवस गुलजार यांच्या ‘एक शायर इस शहर में’ या सत्राने गाजवला. या सत्रात गुलजार यांनी मुंबईवर लिहिलेल्या आपल्या निवडक कविता सादर केल्या. त्याला साहित्यप्रेमीनी टाळ्याच्या कडकडात दाद दिली. संध्याकाळच्या सत्रात लेखक आणि खासदार शशी थरुर तसेच माजी राजदूत पवन वर्मा यांनी भारतीय प्राचीन तत्त्वज्ञानावर सांगोपांग चर्चा केली. तर तिसऱ्या दिवशी शेफाली शाह यांच्या ‘द चॉइसेस वी मेक’ या आत्मचरित्रावरील चर्चासत्राने रंग भरले. याशिवाय, जागतिक अर्थशास्त्रज्ञ कौशिक बसू यांच्या भारतीय अर्थव्यवस्थेवर व्यापक चिंतनातून भविष्यातील आर्थिक आव्हानांवर प्रकाश टाकला.

तरुणांचा लक्षणीय सहभाग
तीन दिवसांच्या या महोत्सवात जेन-झी तरुण-तरुणींचा सहभाग लक्षणीय होता. महोत्सवाच्या व्यवस्थापनाची जबाबदारीही या तरुणांकडे सोपवण्यात आली होती. नरीमन पॉइंट येथील समुद्रकिनाऱ्यालगत असलेल्या एनसीपीएच्या सभागृहात तिन्ही दिवस मोफत प्रवेशाची सुविधा होती. महोत्सवातील विविध स्टॉल्स उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होते. यंदा लहान मुलांसाठी दोन दिवस स्वतंत्र ‘दी लिटल फेस्टिव्हल’चे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये बालसाहित्य आणि कवितांच्या सादरीकरणाचा समावेश होता.विशेष म्हणजे, या ठिकाणी खाण्यापिण्याच्या वस्तू अपेक्षेप्रमाणे महाग नव्हते, हा सुखद धक्का असल्याचे अनेक साहित्यप्रेमीनी आवर्जून सांगितले.

तुफान पुस्तकविक्री
नेहमीप्रमाणे यंदाही किताबखानाच्या पुस्तकविक्रीच्या स्टॉलला चांगला प्रतिसाद मिळाल्याचे आयोजकांनी सांगितले. दोन दिवसांत ३०० हून अधिक पुस्तकांची विक्री झाली. गुलजार यांच्या ‘आमची मुंबई’ या कवितासंग्रहासह शशी थरुर यांच्या पुस्तकांना वाचकांची विशेष मागणी मिळाल्याचे सांगण्यात आले. दिग्गज लेखकांच्या स्वाक्षऱ्या मिळत असल्याने संबधित पुस्तके खरेदीकडे वाचकप्रेमींचा कल अधिक होत्याचे चित्र होते. पहिल्यांदाच सुरू केलेल्या बुक स्वॅपिंग स्टॉललाही वाचकप्रेमींकडून भरघोस प्रतिसाद मिळाला. अनेकांनी आपली जुनी पुस्तके जमा करून त्याबदल्यात उपलब्ध पुस्तके घेतली.

मी डोंबिवलीवरून येथे आले. मला येथे सर्व लेखक आणि साहित्यिकांशी संवाद साधता आला. रील्सच्या जमान्यात आपण साहित्याशी मैत्री वाढवली पाहिजे.
- स्मायली भट, डोंबिवली

मला शशी थरूर यांची पुस्तके आणि भाषणे आवडतात. त्यांना ऐकण्यासाठी मी आवर्जून आलो. हे एक वेगळे जग आहे आणि त्याचा अनुभव घेता आला.
- वृषभ भोस, विद्यार्थी, सायन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com