

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २५ : रेल्वे स्थानकासह उपनगरी रेल्वे प्रवासादरम्यान गर्दीचा फायदा घेत मोबाईल चोरीच्या घटनांमध्ये प्रवाशांना लक्ष्य करण्यात आले आहे. २० ते २३ ऑक्टोबरदरम्यान घडलेल्या विविध घटनांत आठ प्रवाशांचे मोबाईल चोरीला गेल्याच्या तक्रारी ठाणे रेल्वे पोलिस ठाण्यात दाखल झाल्या आहेत. चोरीला गेलेल्या मोबाईलची एकूण किंमत तीन लाख ४६ हजार रुपये आहे.
शहापूर येथील मानस देशमुख हा विद्यार्थी २२ ऑक्टोबरला ठाणे स्थानकात वाशी लोकलमध्ये चढत असताना त्याच्या खिशातील २५ हजारांचा मोबाईल चोरीला गेला. त्याच दिवशी ठाणे-पनवेल लोकलमध्ये चढताना दीपक रंजन यांचा ३० हजारांचा, तर आसनगाव लोकलमध्ये चढताना सूरज देवकर यांचा १५ हजारांचा मोबाईल चोरीला गेला. धीरज परदेशी यांचा ३६ हजारांचा मोबाईलही कल्याण लोकलमध्ये चढताना चोरीला गेल्याची तक्रार आहे.
कोणार्क एक्स्प्रेसमधून शुक्रवारी (ता. २३) प्रवास करताना ओमप्रकाश काळे यांच्या हातातील ३५ हजारांचा आयफोन रेल्वे रुळांवर पडला. त्यानंतर तो मिळाला नसल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. याच दिवशी ऐरोली स्थानकात अंकिता चव्हाण यांच्या बॅगेतून ५० हजारांचा आयफोन चोरीला गेला. केरळहून आलेल्या मोहम्मद हनी यांचा ७० हजारांचा आयफोन ठाणे स्थानकात झोप लागली असताना चोरीला गेला. जयेश राणे यांचा ८५ हजारांचा मोबाईल विदर्भ एक्स्प्रेसमध्ये चढताना चोरीला गेल्याची तक्रार आहे. या घटनांमुळे रेल्वे प्रवासादरम्यान मोबाईल आणि मौल्यवान वस्तूंच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.