

नऊ महिन्यांच्या बाळाला स्कायवॉकवरून फेकले!
घाटकोपरमधील घटना; वडिलांना अटक
घाटकोपर (बातमीदार) ता. २६ ः घाटकोपर रेल्वे स्थानकाबाहेरील स्कायवॉकवर कौटुंबिक वादातून एका पित्याने आपल्या अवघ्या नऊ महिन्यांच्या बाळाला फेकल्याची धक्कादायक घटना रविवारी (ता. २५) रात्री घडली. या घटनेत आरव खारवा हे बाळ गंभीर जखमी झाले असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी घाटकोपर पोलिसांनी बाळाचे वडील जाफर शेख याला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री सुमारे ८.१० वाजण्याच्या सुमारास आरती खारवा (वय २२) या आपल्या नऊ महिन्यांच्या मुलासह घाटकोपर रेल्वे स्थानकाबाहेरील स्कायवॉकवर उपस्थित होत्या. त्या वेळी त्यांचा पती जाफर शेख तेथे आला. दोघांमध्ये वाद सुरू झाला. या वादातून जाफर याने पत्नीला शिवीगाळ केली. त्यानंतर संतापाच्या भरात त्याने नऊ महिन्यांच्या आरवला स्कायवॉकवरून खाली फेकल्याचा आरोप आहे. बाळ पडल्याची माहिती मिळाल्यानंतर सहाय्यक पोलिस निरीक्षक लीना लोहार आणि पोलिस शिपाई भरत ठाकूर यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी दोन व्यक्तींच्या मदतीने रिक्षातून बाळाला तातडीने राजावाडी रुग्णालयात दाखल केले. तेथे त्याच्यावर उपचार सुरू करण्यात आले. पुढील उपचारांसाठी त्याला सायन रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. या घटनेप्रकरणी घाटकोपर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी जाफर शेख याला अटक केली असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असल्याचे घाटकोपर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विठ्ठल आर्डेकर यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.