

बदलापूर, ता. २७ (बातमीदार) : इन्स्टाग्राम खात्याच्या तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे फरारी आरोपी दिग्विजय ऊर्फ डिग्या पिसाळ याचा माग काढण्यात कुळगाव पोलिसांना यश आले आहे. ठाणे ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने या प्रकरणात तीन अग्निशस्त्रे, आठ जिवंत काडतुसे आणि थार गाडी असा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत दोन तरुणांना अटक करण्यात आली असून, एका विधिसंघर्षग्रस्त बालकासह अन्य संबंधितांना ताब्यात घेण्यात आले.
ठाणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक विनयकुमार राठोड यांनी जिल्ह्यातील पाहिजे आणि फरारी आरोपींचा शोध घेण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार कुळगाव पोलिसांचे पथक तपास करीत असताना शिपाई नरेंद्र कोळी यांना पिसाळ हा अंबरनाथमधील साई वालीवली परिसरात असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी शोधमोहीम राबवली असता,
सायंकाळी थार गाडीत दिग्विजय दिसून आला. पोलिसांची चाहूल लागताच त्याने गाडी जांभूळ गावाच्या दिशेने पळवली. पोलिसांनी पाठलाग केल्यानंतर गावाबाहेरील जंगलालगतच्या मोकळ्या जागेत गाडी थांबवून तो साथीदारांसह पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला. यावेळी पोलिसांनी जय गणेश जाधव या विधिसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेतले.
थार गाडीची झडती घेतली असता त्यात चांदीसारख्या रंगाचे दोन गावठी कट्टे आणि सात जिवंत काडतुसे आढळली. याप्रकरणी कुळगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात साहील जाधव (वय १९) आणि ऋतुराज राठोड (वय १९) यांना अटक करण्यात आली.
तपासाला दिशा
पिसाळ याचा शोध घेण्यासाठी सायबर तज्ज्ञ पुष्कर झांटे यांच्या मदतीने त्याच्या इन्स्टाग्राम खात्याचे तांत्रिक विश्लेषण करण्यात आले. त्यातून संबंधित ई-मेल खात्याची माहिती मिळाली. पुढील तपासातून जेम्स राजेश याची माहिती समोर आल्यानंतर त्याला नवी मुंबईतील कळंबोली परिसरातून ताब्यात घेण्यात आले.
त्याच्या मोबाईलची तपासणी केली असता पिसाळ आणि त्याचे साथीदार मुंबईतील बोरीवली परिसरात त्यांचा सहकारी देवा काल्हापुरे याच्या घरी असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे कुळगाव पोलिसांच्या पथकाने मुंबईतील दहिसर परिसरातून संबंधित आरोपींना ताब्यात घेतले. तपासादरम्यान पिसाळ याच्याकडून आणखी एक गावठी कट्टा जप्त करण्यात आला. त्यामुळे या प्रकरणात एकूण तीन अग्निशस्त्रे आणि आठ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक प्रदीप बोदडे करीत आहेत.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
पोलिस अधीक्षक विनयकुमार राठोड, अपर पोलिस अधीक्षक अनमोल मित्तल, मुरबाड विभागाचे उपविभागीय अधिकारी अनिल लाड आणि स्थानिक गुन्हे शाखेतील दादासो एडके यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. कुळगाव पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी शिवाजी ढवळे, पोलिस उपनिरीक्षक प्रदीप बोदडे, महेश कदम, दिपेश किणी, हवालदार रवींद्र दामु मोरे, दीपक गायकवाड, बी. एच. पवार, शिपाई नरेंद्र कोळी, सचिन जाधव, अविनाश वाकचौरे, भूषण रजपुत्त आणि सायबर तज्ज्ञ पुष्कर झांटे यांनी या कारवाईत सहभाग घेतला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.