

पूर्णेकर हत्येचा उद्रेक रस्त्यावर
- राम पूर्णेकर यांना ताब्यात घेतल्याने संतापाचा भडका
- ठाण्यात जाळपोळ, घोडबंदरसह मुंबई-नाशिक महामार्ग ठप्प
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २७ : प्रदीप ऊर्फ बाळू पूर्णेकर यांच्या हत्येप्रकरणी संशयितांना अटक करण्याच्या मागणीवरून ठाण्यात संतापाचा उद्रेक झाला आहे. न्यायासाठी आंदोलन करण्यास निघालेल्या राम पूर्णेकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याने संतप्त नागरिक रस्त्यावर उतरले. विविध राजकीय पक्षांचे नेते, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले असून, जाळपोळीच्या घटनेने तणावात भर पडली आहे. नौपाडा पोलिस ठाण्याबाहेर सुरू झालेल्या आंदोलनाचे पडसाद शहराच्या वाहतुकीवर उमटले. नौपाड्यात आंदोलन सुरू असतानाच मानपाडापर्यंत त्याची धग पोहोचली. आंदोलकांनी काही ठिकाणी टायर जाळण्याचा प्रयत्न केला. मोठ्या संख्येत आंदोलक बाहेर पडल्याने घोडबंदर मार्गासह मुंबई-नाशिक महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने मंगळवारी मध्यरात्रीपर्यंत ठाण्यात भूतपूर्व कोंडी पाहायला मिळाली. संशयितांच्या अटकेच्या मागणीवर आंदोलक आक्रमक झाल्याने परिस्थिती गंभीर बनली असून, बुधवारीही याचे पडसाद उमटण्याची चिन्हे आहेत.
प्रदीप पूर्णेकर यांचे पुत्र राम पूर्णेकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलनाचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतल्यानंतर शहरात संतापाचा उद्रेक नौपाडा पोलिस ठाण्याबाहेर मंगळवारी पाहायला मिळाला. राम यांना ताब्यात घेतल्याचे समजताच पूर्णेकर कुटुंबीयांसह विविध राजकीय पक्षातील नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी पोलिस ठाण्याकडे धाव घेतली.
आंदोलकांनी या वेळी मीनाक्षी आणि राजेंद्र शिंदे यांना अटक केल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याचा आक्रमक पवित्रा पूर्णेकर कुटुंबीयांनी घेत ठिय्या देण्यात आला. त्यानंतर रात्री ९ वाजेच्या सुमारास घोडबंदर रोडवरील मानपाडा परिसरातील नागरिकांनी एकत्र येत, मानपाडा उड्डाणपुलाखाली रास्ता रोको केला. यामुळे परिसरातील वाहतूक पूर्णपणे विस्कळित झाली. रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून, मानपाडा उड्डाणपुलावरूनही वाहनांची वाहतूक ठप्प झाल्याचे चित्र दिसून आले. त्यामुळे या रस्ता रोको आंदोलनामुळे नाशिक-मुंबई महामार्गावरदेखील अवजड वाहनांच्या रांगा लागल्या होत्या, तर ठाण्याहून घोडबंदरकडे जाणाऱ्या मार्गावरदेखील वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र दिसून आले. यामुळे १० ते १५ मिनिटांच्या प्रवासाला अर्ध्या तासाहून अधिक वेळ लागल्याचे वाहनचालकांकडून सांगितले जात आहे.
………………..
ठाणेकरांना सहभागी होण्याचे आवाहन
आपल्या कुटुंबाला मोठ्या मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचे प्रदीप पूर्णेकर यांचे पुत्र राम पूर्णेकरांनी सांगत, अशी वेळ अन्य कोणत्याही कुटुंबावर येऊ नये, असे भावनिक आवाहन केले. न्यायासाठी ठाणेकरांनी एक-दोन दिवस रस्त्यावर उतरून आंदोलनाला पाठिंबा द्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. तपासातील संशयित बाबींची सखोल चौकशी करून न्याय मिळेपर्यंत लढा सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.