ठाण्याचे तापमान २० अंशावर

ठाण्याचे तापमान २० अंशावर
Published on: 

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २८ : दिवसा उकाड्याने हैराण झालेल्या ठाणेकरांना रात्रीच्या गारव्याने दोन दिवस दिलासा दिला. बुधवारी (ता. २८) किमान तापमान २० अंशांवर घसरल्याने रात्रीचे वातावरण सुखद झाले. मात्र, हा दिलासा तात्पुरता असून, गुरुवार (ता. २९)पासून पुन्हा तापमान वाढण्याची शक्यता हवामान अभ्यासकांनी वर्तवली आहे.

ऑक्टोबरचा शेवट जवळ आला की हवेत गारवा जाणवू लागेल, अशी अपेक्षा असते. मात्र, यंदा दिवसा उन्हाचा चटका आणि दमट हवेमुळे जाणवणारा उकाडा कायम आहे. घराबाहेर पडल्यावर उन्हाचा त्रास आणि रात्रीही जाणवणारी अस्वस्थता यामुळे नागरिकांची काहिली होत होती. गेल्या काही दिवसांचे तापमान कमाल ३७ ते ४० अंश सेल्सिअसवर होते. अशा परिस्थितीत गेल्या दोन दिवसांत रात्रीच्या तापमानात झालेली घट सुखावणारी ठरली. अर्णव चक्रीवादळामुळे रात्रीच्या हवेत जाणवलेला गारवा हा केवळ तापमानातील बदल असला, तरी उकाड्याने त्रस्त झालेल्यांना त्यातून काही काळ आराम मिळाला.

कल्याण, डोंबिवलीलाही दिलासा
आजच्या तापमान नोंदीनुसार, ठाण्यात किमान तापमान २० अंश सेल्सिअस होते. कोकणातील अनेक भागांतही तापमानात घट झाली. विक्रमगड तालुक्यातील सुकसाळे येथे १५.४, नेरळ येथे १६.४, बदलापूर येथे १६.५, पालघर येथे १६.७, कल्याण येथे १९.२ आणि डोंबिवली येथे १९.५ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदवले गेले.

थंडीची चाहूल नव्हे, तात्पुरता बदल
चक्रीवादळाच्या प्रभावामुळे वातावरणात बदल झाला असून, त्यातून रात्रीच्या तापमानात घट झाली आहे. मात्र, हा थंडीच्या आगमनाचा संकेत नसल्याचे हवामान अभ्यासात अभिजीत मोडक यांनी स्पष्ट केले. गुरुवारपासून किमान तापमान पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्या रात्री जाणवणारा गारवा कमी होऊन उकाडा पुन्हा जाणवू शकतो.

नाशिक, पुण्यात तीन वर्षांतील नीचांकी नोंद
पश्चिम दख्खन भागातही तापमानात घट झाली आहे. देवशी येथे १२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असून, ते राज्यातील त्या दिवसाचे सर्वांत कमी किमान तापमान ठरले. नाशिकमध्ये १४.३, तर पुण्यात १४.९ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. या दोन्ही शहरांत ऑक्टोबरमधील किमान तापमान गेल्या तीन वर्षांतील नीचांकी ठरले आहे.

Marathi News Esakal
www.esakal.com