ना विकलेल्या म्हाडाच्या घरांच्या किंमती घटणार

ना विकलेल्या म्हाडाच्या घरांच्या किंमती घटणार
Published on: 

विक्री न झालेल्या घरांच्या किमती घटणार
म्हाडाच्या बैठकीत होणार निर्णय

बापू सुळे ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २८ : म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून वेळोवेळी लाॅटरीत समावेश करूनही विक्री न झाल्याने घरांच्या किमती लवकरच घटणार आहेत. या घरांची प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या योजनेंतर्गत (एफसीएफएस) विक्री केली जाणार आहे. त्यामुळे त्यांच्या किमती कमी करण्यासाठी लवकरच म्हाडा प्राधिकरणाच्या बैठकीत निर्णय घेतला जाणार आहे. दरम्यान, विक्री न झालेल्या घरांची संख्या ३००-४०० एवढी असून, त्यासाठी दिवाळीनंतर जाहिरात काढली जाणार आहे.
म्हाडाकडून दरवर्षी मुंबईतील घरांच्या विक्रीसाठी लाॅटरी जाहीर केली जाते. त्यामध्ये म्हाडाने उभारलेल्या घरांबरोबरच खासगी विकसकांकडून म्हाडाला मिळालेल्या घरांचा समावेश असतो. मात्र, त्यांच्या किमती कोट्यवधी रुपयांच्या घरात असल्याने त्यांना प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे दोन वेळा लाॅटरीत समावेश करूनही विक्री न झालेल्या घरांची म्हाडाकडून प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर जाहिरात काढून विक्री केली जाते. सध्या म्हाडाकडे अशा प्रकारची ३००-४०० घरे असून, त्यामध्ये कोट्यवधी रुपये अडकून पडले आहेत. त्यामुळे या घरांच्या किमती कमी करून विक्री करण्याचा म्हाडाचा प्रयत्न असल्याची माहिती म्हाडाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. म्हाडा प्राधिकरणाच्या बैठकीत यावर निर्णय घेतला जाणार आहे.
...
किती होणार घट?
म्हाडाच्या मुंबई मंडळाने नुकत्याच काढलेल्या लाॅटरीतील कन्नमवार नगर, विक्रोळी येथील घरांच्या किमती जास्त असल्याची ओरड झाल्याने म्हाडाने सुमारे साडेसात टक्के एवढ्या किमती कमी केल्या होत्या. त्याआधारेच न विकल्या जाणाऱ्या घरांच्या सुमारे ७-१० टक्के एवढ्या किमती कमी केल्या जाऊ शकतात, असे सूत्रांनी सांगितले.
...
नफा, खर्चाला कात्री
घरांच्या किमती निश्चित करताना म्हाडाकडून नाममात्र नफा आणि प्रशासकीय खर्चाचा त्यामध्ये समावेश केला जातो. मात्र, विक्री न झाल्याने म्हाडाचा निधी अडकून पडत आहे. त्यामुळे नफा आणि प्रशासकीय खर्चाला कात्री लावून किमती कमी करण्याचे म्हाडाचे नियोजन आहे.
...
मुंबई मंडळाने दोनपेक्षा जास्त वेळा लाॅटरीत समावेश करूनही विक्री न झालेल्या घरांच्या किमती कमी करून त्यांची एफसीएफएसअंतर्गत विक्री करण्याचे नियोजन आहे. त्यासाठी म्हाडा प्राधिकरणाच्या बैठकीत किमती कमी करण्याबाबत योग्य निर्णय घेतला जाईल.
- मिलिंद बोरीकर, मुख्य अधिकारी, मुंबई मंडळ (म्हाडा)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com