

जिद्दीला यशाची सलामी!
गिरीधर सुळे FDA मध्ये अधिकारी
वसई, ता. २९ (बातमीदार) : स्पर्धा परीक्षांमध्ये वारंवार अपयश आले, काही गुणांनी संधी हुकली; मात्र जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर नालासोपारा येथील समेळपाड्यातील गिरीधर बाबुराव सुळे यांनी अखेर यशाला गवसणी घातली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून त्यांची अन्न व औषध प्रशासन विभागात विश्लेषण रसायनशास्त्रज्ञ (गट-ब) पदावर मुंबई आयुक्तालयात निवड झाली आहे. सामान्य कुटुंबातून पुढे आलेल्या गिरीधर यांच्या या यशामुळे सुळे कुटुंबीयांसह परिसरात आनंदाचे वातावरण आहे.
गिरीधर यांचे मूळ गाव सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील सुळेवाडी आहे. २०१० मध्ये त्यांचे कुटुंब वसई तालुक्यात स्थायिक झाले. त्यांनी नालासोपारा येथील केएमपीडी शाळेत माध्यमिक शिक्षण, सातारा येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात पुढील शिक्षण, तर वांद्रे येथे बी. फार्मसीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू केली. गेल्या सहा वर्षांत राज्य उत्पादन शुल्क, पोलिस उपनिरीक्षक, राज्यसेवा आणि वन विभागाच्या विविध परीक्षांसाठी त्यांनी प्रयत्न केले. अनेकदा अपयशाचा सामना करावा लागला, तरी त्यांनी ध्येयापासून माघार घेतली नाही. या काळात त्यांनी पाच ते सहा वर्षे फार्मसी अधिकारी म्हणूनही काम केले.
वाचनालयाचे मोलाचे योगदान
“स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना शांत वातावरणात अभ्यास करता यावा, यासाठी अभ्यासिका केंद्र उभारण्यात आले आहे. गिरीधर सुळे हे अत्यंत हुशार असून वाचनालयात अनेक तास नियमित अभ्यास करत असत. त्यांच्या मेहनतीला यश मिळाले, ही कौतुकाची बाब आहे.”
- अमित मोदी, ग्रंथपाल
अभ्यासिका केंद्रांचा विद्यार्थ्यांना फायदा
“वसई-विरार महापालिका क्षेत्रात अभ्यासिका केंद्रे उभारण्यावर माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांनी नेहमीच भर दिला. त्याचा फायदा विद्यार्थ्यांना होत आहे. गिरीधर सुळे यांची अन्न व औषध प्रशासन विभागात निवड होणे ही वसईकरांसाठी अभिमानाची बाब आहे.”
- नारायण मानकर, माजी महापौर
छायाचित्र ओळ : वसई येथील डॉ. के. बी. हेडगेवार वाचनालयात गिरिधर सुळे यांचे अभिनंदन करताना पदाधिकारी.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.