

श्रीवर्धनचे सीसीटीव्ही कुचकामी
९५ पैकी १४ कॅमेरेच सुरू; देखभाल-दुरुस्तीबाबत प्रश्न कायम
श्रीवर्धन, ता. २९ (वार्ताहर) : शहराची सुरक्षितता आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी सुमारे दोन कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या श्रीवर्धन नगर परिषदेच्या सीसीटीव्ही यंत्रणेची अवस्था बिकट झाली आहे. एकूण ९५ कॅमेऱ्यांपैकी केवळ १४ कॅमेरे सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे महिला, पर्यटक आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी उभारलेल्या या यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
सीसीटीव्ही यंत्रणेचे थेट प्रक्षेपण आणि मुख्य नियंत्रण कक्ष श्रीवर्धन पोलिस ठाण्यात कार्यान्वित करण्यात आला आहे, मात्र सध्या स्क्रीनवर नेटवर्क खंडित झाल्याचे आणि नेटवर्क सेटिंग्जपर्यंत पोहोचता येत नसल्याचे संदेश दिसत आहेत. त्यामुळे यंत्रणेतील तांत्रिक बिघाडाचा प्रश्न समोर आला आहे.
महिला व पर्यटकांची सुरक्षा, समुद्रकिनाऱ्यावरील बेशिस्त प्रकारांना आळा घालणे आणि वाहतूक नियंत्रणासाठी ही यंत्रणा महत्त्वाची मानली जाते, मात्र बहुतांश कॅमेरे बंद असल्याने प्रकल्पाच्या उपयुक्ततेवर नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
श्रीवर्धन नगर परिषदेकडून ही यंत्रणा देखभालीसाठी अन्य व्यक्तीकडे सोपविण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे, मात्र बिघाडाची कारणे, दुरुस्तीची जबाबदारी आणि सर्व कॅमेरे पुन्हा सुरू करण्याची कालमर्यादा अद्याप स्पष्ट झालेली नाही.
देखभाल आणि नियंत्रणातील समन्वयाचा अभाव?
सीसीटीव्ही यंत्रणेची देखभाल-दुरुस्ती नगर परिषदेच्या अखत्यारीत, तर नियंत्रण कक्ष पोलिसांकडे असल्याने जबाबदारीचा प्रश्न उपस्थित होत आहे. कॅमेरे बंद पडल्यास नागरिक पोलिसांकडे तक्रार करतात; मात्र दुरुस्तीची जबाबदारी नेमकी कोणाची, याबाबत स्पष्टता आवश्यक आहे. दोन कोटी रुपये खर्चून उभारलेल्या प्रकल्पातील बहुतांश कॅमेरे बंद असताना संबंधित कंपनीवर नगर परिषद कारवाई करणार का, तसेच संपूर्ण यंत्रणा पूर्ववत करण्यासाठी ठोस पावले कधी उचलली जाणार, असे प्रश्न स्थानिक नागरिकांकडून उपस्थित केले जात आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.