

तुटलेल्या तारेने घेतले चार बळी
रिटघर, खैरवाडीत दोन गाई अन् दोन बैलांचा मृत्यू; बाधित कुटुंबांकडून मदतीची मागणी
पनवेल, ता. १ (बातमीदार) : पनवेल तालुक्यातील रिटघर आणि खैरवाडी येथे महावितरणची विद्युत तार तुटून पडल्याने विजेचा धक्का बसून चार जनावरांचा जागीच मृत्यू झाला. यामध्ये दोन गाई आणि दोन बैलांचा समावेश आहे. या दुर्घटनेमुळे दोन शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, संबंधित कुटुंबांना तातडीने भरपाई द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
रिटघर येथील शेतकरी सुनील गोटराम भोपी यांची एक गाय आणि एक बैल, तर खैरवाडी येथील हिरामन गोविंद खैर यांची एक गाय आणि एक बैल मृत्युमुखी पडले. पहाटेच्या सुमारास शेतकरी जनावरांना गोठ्यातून बाहेर काढत असताना ही घटना घडली. कमी दाबाच्या (एलटी) विद्युत वाहिनीची तार तुटून जमिनीवर पडली होती. तिच्या संपर्कात आल्याने जनावरांना विजेचा जोरदार धक्का बसला.
घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी महावितरण प्रशासनाशी संपर्क साधला. त्यानंतर वायरमन पुजारी आणि मेंगल तसेच संबंधित पोलीस पाटील घटनास्थळी दाखल झाले. तेथे पंचनामा करण्यात आला असून, पशुवैद्यकीय अधिकारी तपासणी करून अहवाल तयार करणार आहेत. त्यानंतर शवविच्छेदन आणि पुढील कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.
सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर
महावितरणकडून विद्युत वाहिन्यांची नियमित तपासणी आणि देखभाल होत नसल्यास अशा घटना पुन्हा घडण्याची भीती व्यक्त होत आहे. जनावरे हे शेतकऱ्यांच्या उपजीविकेचे महत्त्वाचे साधन असल्याने झालेल्या नुकसानीची भरपाई तातडीने द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.