पोटात गेलेला अख्खा टूथब्रश काढला!

पोटात गेलेला अख्खा टूथब्रश काढला!
Published on: 

पोटातून काढला अख्खा टूथब्रश!
१९ सेंटीमीटरचा ब्रश एंडोस्कोपीद्वारे बाहेर; खारघरच्या डॉक्टरांचे कौशल्य
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. ४ : दात घासताना हातातून निसटलेला टूथब्रश थेट पोटात जाऊन अडकला आणि एका सामान्य सकाळी पेणमधील ५० वर्षीय रिक्षाचालकावर मोठे संकट ओढवले. तब्बल १९ सेंटीमीटर लांबीचा अख्खा टूथब्रश पोटात गेल्याने घाबरलेल्या रुग्णाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, खारघर येथील मेडिकव्हर हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी कोणतीही शस्त्रक्रिया न करता अवघ्या ३० मिनिटांत एंडोस्कोपीद्वारे हा टूथब्रश बाहेर काढला. डॉक्टरांच्या कौशल्यामुळे रुग्णाला जीवदान मिळाले.
पेण येथील राजेंद्र मालुसरे हे नेहमीप्रमाणे सकाळी दात घासत असताना अचानक टूथब्रश त्यांच्या तोंडातून घशाखाली उतरून पोटात गेला. त्यांनी तातडीने स्थानिक डॉक्टरांकडे धाव घेतली. एक्स-रे काढण्यात आला; मात्र प्लॅस्टिकचा असल्याने टूथब्रश त्यात दिसून आला नाही. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांना खारघर येथील मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. रुग्णाच्या पोटात सौम्य वेदना होत होत्या.
गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट, हेपॅटोलॉजिस्ट आणि थेरप्युटिक एंडोस्कोपिस्ट डॉ. रावसाहेब राठोड यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तातडीने एंडोस्कोपी केली. या वेळी पोटात आडव्या स्थितीत अडकलेला १९ सेंटीमीटरचा टूथब्रश दिसून आला. लांब, टणक आणि न वाकणारी वस्तू असल्याने ती बाहेर काढणे आव्हानात्मक होते. यामध्ये अन्ननलिका फाटणे, आतड्याला छिद्र पडणे किंवा रक्तस्राव होण्याचा धोका होता.

अवघ्या अर्ध्या तासात यश
एंडोस्कोपला विशेष हूड लावून टूथब्रशचे एक टोक पकडण्यात आले. पोट आणि अन्ननलिका जोडणारा भाग तसेच घशातील अरुंद वळण पार करताना विशेष काळजी घेण्यात आली. रुग्णाच्या शरीराची स्थिती बदलून अत्यंत सावधपणे संपूर्ण टूथब्रश तोंडावाटे बाहेर काढण्यात डॉक्टरांना यश आले. त्यानंतर पुन्हा एंडोस्कोपी करून पचनमार्गाला कोणतीही दुखापत झाली नसल्याची खात्री करण्यात आली. काही तासांतच रुग्णाची प्रकृती स्थिर झाली आणि त्यांना घरी सोडण्यात आले. कोणतीही शस्त्रक्रिया न करता मिळालेले हे यश वैद्यकीय कौशल्याचे उदाहरण ठरले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.