आतषबाजीने हवा बिघडवली

आतषबाजीने हवा बिघडवली
Published on: 

ठाण्यात फटाक्यांच्या आतषबाजीने
हिरानंदानी इस्टेटचे ‘गॅसचेंबर’

‘एक्यूआय’ ९२२वर; नवी मुंबई, डाेंबिवलीत प्रदूषणाचा कहर

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ९ : लक्ष्मीपूजनाच्या दिवशी झालेल्या फटाक्यांच्या आतषबाजीने रविवारी ठाण्यासह जिल्ह्यातील अनेक शहरांचा श्वास कोंडला. हवेची गुणवत्ता कमालीची खालावल्याने ‘एक्यूआय’ या खासगी ॲपमध्ये ठाण्यातील हिरानंदानी इस्टेटमध्ये हवा गुणवत्ता निर्देशांकाने (एक्यूआय) तब्बल ९२२ची धोकादायक पातळी गाठली. त्याखालोखाल नवी मुंबईतील सीवूड्स येथे ८०३, तर डोंबिवलीत ६५१ इतकी नोंद झाली. फटाक्यांच्या आतषबाजीचा परिणाम सोमवारीही कायम राहिल्याने हवेची गुणवत्ता घातक श्रेणीत नोंदवली गेली. ठाणे महापालिकेने दिलेल्या आकडेवारीनुसार ठाणे शहरात एक्यूआय १५० नाेंदला गेला असला तरी खासगी ॲपवर शहरातील विविध भागांत निर्देशांकाने अतिधाेकादायक पातळी गाठल्याची नाेंद झाली.

हवा आणि प्रदूषण मोजणाऱ्या ‘एक्यूआय’ या खासगी ॲपमध्ये ठाण्यातील हिरानंदानी इस्टेटसह विविध ठिकाणी लक्ष्मीपूजनाच्या रात्रीची आकडेवारी चिंताजनक बनली आहे. उत्सवाचा आनंद घेताना शहराची हवा आणि नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. लक्ष्मीपूजनानंतर फटाक्यांच्या आतषबाजीनंतर रात्री ९ ते मध्यरात्री १ या वेळेत प्रदूषणाची तीव्रता सर्वाधिक नोंदवली गेली. ‘एक्यूआय डॉट इन’ या खासगी हवेची गुणवत्ता मोजणाऱ्या प्लॅटफॉर्मवरील नोंदीनुसार, ठाणे शहराचा हवा गुणवत्ता निर्देशांक रविवारी दुपारी ४च्या सुमारास ९७ होता. रात्री ११.०१ वाजता तो थेट ५८५ वर पोहोचला. हिरानंदानी इस्टेट परिसरात रात्री ११.३०च्या सुमारास ९२२, वेदांता कॉम्प्लेक्समध्ये ७०३, तर पाटलीपाडा येथे ५६३ इतकी नोंद झाली. याच वेळी हिरानंदानी इस्टेटमधील पीएम १०चे प्रमाण ६४६, तर पीएम २.५ चे प्रमाण ५३७ होते.

ठाण्याबरोबरच नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, भिवंडी, बदलापूर आणि अंबरनाथमध्येही प्रदूषणाची पातळी मोठ्या प्रमाणात वाढली. नवी मुंबईतील सीवूड्स येथे एक्यूआय ८०३, तर घणसोलीमध्ये ६४१ नोंदविण्यात आला. डोंबिवलीत ६५१, कल्याणमध्ये ५६०, बदलापूरमध्ये ५७६ आणि भिवंडीत ५२१ इतकी नोंद झाली. अंबरनाथ, उल्हासनगर आणि शहाड परिसरातही मध्यरात्रीनंतर आणि पहाटेपर्यंत प्रदूषणाची तीव्रता कायम होती. अनेक ठिकाणी पीएम २.५ आणि पीएम १० या सूक्ष्म धूलिकणांचे प्रमाणही वाढले होते.

सोमवारीही हवा घातकच
रात्री फटाक्यांची आतषबाजी थांबल्यानंतरही दुसऱ्या दिवशी सकाळी हवेची गुणवत्ता सुधारलेली नव्हती. सोमवारी सकाळी १०.११ वाजता ठाण्याचा एक्यूआय १६१ नोंदविण्यात आला. या वेळी पीएम २.५चे प्रमाण ७०, तर पीएम १०चे प्रमाण १३३ मायक्रोग्रॅम प्रतिघनमीटर होते. ‘एक्यूआय डॉट इन’ने हवेची गुणवत्ता ‘अनहेल्दी’ म्हणजेच आरोग्यासाठी घातक श्रेणीत दाखवली होती. हवेतील सूक्ष्म धूलिकणांमुळे दमा आणि श्वसनविकार असलेल्या रुग्णांसह लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो.
---
कुठे किती प्रदूषण? (८ व ९ नोव्हेंबरच्या नोंदी)
ठाणे
परिसर | कमाल हवा गुणवत्ता निर्देशांक
हिरानंदानी इस्टेट| ९२२
वेदांता कॉम्प्लेक्स| ७०३
पातलीपाडा | ५६३
----
नवी मुंबई
सीवूड्स | ८०३
घणसोली | ६४१
----
इतर शहरे
डोंबिवली | ६५१
कल्याण | ५६०
बदलापूर | ५७६
भिवंडी | ५२१
अंबरनाथ | ४९६
उल्हासनगर | ४५२
शहाड | ४२०
----
सूक्ष्म धूलिकणांचे प्रमाण वाढले
परिसर | पीएम २.५ | पीएम १०
हिरानंदानी इस्टेट | ५३७| ६४६
डोंबिवली | ४०१ | ४८०
कल्याण | ३५५ | ४२५
बदलापूर | ३६४ | —
अंबरनाथ | ३२४ | ५०१
उल्हासनगर | ३०१ | ४२६
शहाड | २८५ | ४२२
(मायक्रोग्रॅम प्रतिघनमीटर)
-----
ठाण्यातील हवेची स्थिती
- ८ नोव्हेंबर दुपारी ४.०१ : एक्यूआय ९७
- ८ नोव्हेंबर रात्री ११.०१ : एक्यूआय ५८५
- ९ नोव्हेंबर सकाळी १०.११ : एक्यूआय १६१
- सकाळी पीएम २.५ : ७०
- सकाळी पीएम १० : १३३

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.