

रुग्णांच्या जीवाशी खेळ
जिन्यावरून उतरला प्लास्टर लावलेला वृद्ध
घाटकोपर, ता. ११ (बातमीदार) : मुंबई महापालिकेच्या केईएम रुग्णालयातील सेठ धुरमल बजाज अस्थिव्यंग केंद्रात लिफ्टअभावी रुग्णांचे हाल होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पायाला प्लास्टर लावलेल्या एका वृद्ध रुग्णाला लिफ्ट उपलब्ध नसल्याने जिन्याच्या पायऱ्यांवर बसून घसरत खाली उतरावे लागले. या घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर रुग्णालयातील मूलभूत सुविधांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
समोर आलेल्या व्हिडिओमध्ये वृद्ध रुग्णाला जिन्यावरून उतरण्यासाठी व्हीलचेअर, स्ट्रेचर किंवा कर्मचाऱ्यांची मदत मिळत नसल्याचे दिसत आहे. पायाला प्लास्टर असतानाही त्याला स्वतःच पायऱ्यांवरून घसरत खाली उतरावे लागले. या प्रकारात रुग्णाचा तोल जाऊन अपघात होण्याची किंवा दुखापत वाढण्याची शक्यता होती. उपचारासाठी रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना अशा प्रकारे त्रास सहन करावा लागत असल्याने रुग्णालयाच्या सुविधांवर प्रश्न उपस्थित होत आहेत.
या घटनेची सार्वजनिक आरोग्य समितीचे अध्यक्ष हरिष भांदिर्गे यांनी गंभीर दखल घेतली आहे. महापालिका आरोग्य व्यवस्थेवर हजारो कोटी रुपये खर्च करत असताना रुग्णालयात लिफ्टसारखी मूलभूत सुविधा उपलब्ध नसणे ही गंभीर बाब असल्याचे त्यांनी म्हटले. लिफ्टची देखभाल आणि दुरुस्ती वेळेत का झाली नाही, ती बदलण्यासाठी प्रशासनाने काय प्रयत्न केले, कामाचे प्रस्ताव कुणी रोखून धरले आणि दुरुस्तीच्या कामात कुणी अडथळे आणले, असे सवाल त्यांनी उपस्थित केले.
संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईचे निर्देश
महापालिकेच्या यांत्रिक व विद्युत विभागातील अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे रुग्णांना त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप भांदिर्गे यांनी केला. केईएम रुग्णालयातील एमआरआय, सीटी स्कॅन यांसारख्या वैद्यकीय सेवांसह लिफ्टच्या सुविधांबाबतही संबंधित विभागाचे पुरेसे लक्ष नसल्याचे त्यांनी नमूद केले. याप्रकरणी यांत्रिक व विद्युत विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने निलंबित करून पदावरून बाजूला करण्याचे निर्देश प्रशासनाला देणार असल्याचे त्यांनी सांगितले. रुग्णांच्या सुरक्षिततेबाबत कोणतीही हलगर्जी खपवून घेतली जाणार नसल्याचा इशाराही त्यांनी दिला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.