

स्वच्छतेनंतर आता टपरीमुक्त नवी मुंबई!
तुर्भे, ता. १५ (बातमीदार) : स्वच्छ सर्वेक्षणात देशात पहिला क्रमांक पटकावल्यानंतर नवी मुंबई महापालिकेने आता शहराच्या सौंदर्यीकरणावर लक्ष केंद्रित केले आहे. स्वच्छ शहरासोबतच अतिक्रमणमुक्त आणि टपरीमुक्त शहराचा संकल्प प्रशासनाने हाती घेतला आहे. त्याचाच भाग म्हणून बेलापूर ते वाशी महामार्गाच्या दोन्ही बाजूंना उभारण्यात आलेल्या अनधिकृत टपऱ्यांवर कारवाई सुरू करण्यात आली आहे. वाशी विभागात आतापर्यंत सुमारे ११ टपऱ्या हटविण्यात आल्या आहेत.
नवी मुंबईत प्रवेश करताना महामार्गाच्या दुतर्फा विविध प्रकारच्या व्यावसायिक टपऱ्या उभारण्यात आल्या होत्या. यामध्ये नीरा विक्री, पीयूसी केंद्र, पंचर दुरुस्ती, हवा भरणे, फास्टॅग विक्री तसेच आरे सरिता विक्री करणाऱ्या टपऱ्यांचा समावेश होता. या अनधिकृत व्यवसायांमुळे महामार्गालगतच्या परिसराचे विद्रूपीकरण होत असल्याने महापालिकेने त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला आहे.
महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या आदेशानुसार आणि उपायुक्तांच्या मार्गदर्शनाखाली वाशी विभागाने ही कारवाई केली. महामार्गाच्या दुतर्फा असलेली अतिक्रमणे हटवून परिसर मोकळा करण्यावर प्रशासनाने भर दिला आहे.
केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत नवी मुंबईने गेल्या काही वर्षांपासून देशातील पहिल्या तीन स्वच्छ शहरांमध्ये स्थान कायम राखले होते. यंदा ‘निश्चय केला, नंबर पहिला’ या घोषणेनुसार शहराने देशात प्रथम क्रमांक पटकावला. या पार्श्वभूमीवर आता शहरातील पदपथ अतिक्रमणमुक्त करून ते नागरिकांच्या वापरासाठी खुले करण्याची मागणी जोर धरत आहे.
स्वच्छतेसोबतच शहराचे सौंदर्य जपणे, वाहतुकीला अडथळा ठरणारी अतिक्रमणे हटविणे आणि नागरिकांना मोकळे पदपथ उपलब्ध करून देणे, या उद्देशाने महापालिकेने टपरीमुक्त शहराच्या दिशेने पावले टाकली आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.