

पवईत अवैध डिझेलविक्रीचा पर्दाफाश; तिघांना अटक
४,५०० लिटर डिझेलसह ४४.६२ लाखांचा मुद्देमाल जप्त; कोपरी परिसरात पोलिसांची कारवाई
सकाळ वृत्तसेवा
जोगेश्वरी, ता. १६ (बातमीदार) : पवईतील हिरानंदानी परिसरातील कोपरी येथे अवैधरीत्या डिझेलचा साठा करून त्याची विक्री करणाऱ्या टोळीचा पवई पोलिसांनी पर्दाफाश केला. या कारवाईत तिघांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून ४,५०० लिटर डिझेलसह वाहने, लोखंडी ड्रम आणि विद्युत पंप असा एकूण ४४ लाख ६२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. १३ आणि १४ नोव्हेंबरदरम्यान पोलिसांनी ही कारवाई केली.
पवई पोलिस ठाण्याच्या हद्दीतील हिरानंदानी परिसरातील कोपरी येथे वाहनतळासाठी आरक्षित असलेल्या जागेवर बेकायदा डिझेलचा साठा करून त्याची विक्री सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी संबंधित ठिकाणी छापा टाकला. या वेळी मोठ्या प्रमाणात डिझेलचा साठा आढळून आला.
याप्रकरणी अफरोज अब्दुल बारी खान (३०), मोहम्मद मोईन नसीम खान (४३) आणि सैबाज इलियास खान (२२) यांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून ४,५०० लिटर डिझेल, लोखंडी ड्रम, महिंद्रा पिकअप टँकर, महिंद्रा पिकअप वाहन, टाटा इंट्रा पिकअप वाहन आणि डिझेल उपसण्यासाठी वापरण्यात येणारा विद्युत पंप जप्त केला.
याप्रकरणी संबंधित कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जप्त केलेल्या डिझेलचा स्रोत काय होता, तसेच या अवैध व्यवसायात आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. या कारवाईमुळे पवई परिसरातील अवैध डिझेलविक्रीचे जाळे उघड होण्याची शक्यता आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.