गांधी समाजसुधारक नव्हते, ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ नरेंद्र जाधवांचा दावा

गांधी समाजसुधारक नव्हते, 
ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ नरेंद्र जाधवांचा दावा
Published on: 

गांधी समाजसुधारक नव्हते!
नरेंद्र जाधव यांचा दावा; नेहरूंवरही टीका

मुंबई, ता. १६ : महात्मा गांधी हे चातुवर्ण्य परंपरेने जखडलेले होते, ते समाजसुधारक नव्हते. त्यांनी जाती निर्मूलन आदी कार्यक्रमाला आणि दलितांच्या स्वतंत्र मतदारसंघाला विरोधच केल्याची टीका ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. नरेंद्र जाधव यांनी केली. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना पुस्तकासाठी नेहरूंनी आर्थिक मदत न केल्याचे सांगत जाधव यांनी नेहरूंवरही टीका केली. आपल्या पुस्तकातून आंबेडकर यांच्या चष्म्यातून गांधी आणि नेहरू यांचे चिंतन केल्याचेही ते म्हणाले.
मुंबई मराठी पत्रकार संघात ग्रंथालीने प्रकाशित केलेल्या जाधव यांच्या ‘डॉ. आंबेडकर जेन-झी आणि त्यानंतर’ तसेच ‘डॉ. आंबेडकर आणि गांधी, नेहरू आणि काँग्रेस’ या पुस्तकांचे प्रकाशन झाले. या वेळी माजी न्यायमूर्ती अभय ठिपसे आदी मान्यवर उपस्थित होते.
जाधव पुढे म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ‘बुद्ध आणि त्याचा धम्म’ हा ग्रंथ प्रकाशित करण्यासाठी त्या वेळी पंडित नेहरूंकडे २० हजार रुपयांची मागणी केली केली होती. त्यास नेहरू यांनी सपशेल ‘नाही’ असे सांगितले होते. इतकेच नव्हे; तर नेहरूंनी बाबासाहेबांना या ग्रंथासाठी लवकरच जागतिक बौद्ध धम्म परिषद भरणार असून, त्यात हे पुस्तक विकून घ्यावे, असा सल्लाही दिल्याचा दावा केला. तसेच डॉ. आंबेडकरांना संविधानाच्या असेंब्लीमध्ये आल्यानंतर मसुदा समितीचे चेअरमन, करण्याचे काम गांधींनी केले; मात्र त्याला नेहरूंचा विरोध होता. नेहरूंच्या मनात एक इंग्लिशमन होता, त्याला आणायचे होते, असाही दावा डॉ. जाधव यांनी करत नेहरूंवरही टीका केली.
हिंदू कोड बिलाच्या संदर्भात सुरुवातीला स्वागत करणाऱ्या नेहरूंनी नंतर माघार घेत तडजोड केली, त्यानंतर बाबासाहेबांनी आपल्या कायदेमंत्रिपदाचा राजीनामा दिला, मात्र नेहरूंचा भारतासाठी अत्यंत आधुनिक दृष्टिकोन होता. त्यांनी आपल्या देशाची आर्थिक पायाभरणी केलेली आहे, याच्याबद्दल माझ्या मनात काहीही शंका नसल्याचा खुलासाही त्यांनी शेवटी केला. महात्मा गांधी आणि पंडित नेहरू यांचे स्वतंत्रपणे मूल्यमापन करणे हा या पुस्तकाचा उद्देश नसून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दृष्टिकोनातून त्यांच्या भूमिका आणि बाबासाहेबांशी असलेले संबंध समजून घेण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
...
विरोधाभासी भूमिका
महात्मा गांधी यांनी स्वतंत्र मतदारसंघ दलितांना देण्यासाठी विरोध केला. त्यांची ही विरोधाभासी भूमिका होती. महात्मा गांधी हे स्वातंत्र्यलढ्यातील महत्त्वाचे राष्ट्रीय नेते होते; मात्र जातिव्यवस्थेच्या निर्मूलनाच्या बाबतीत त्यांची भूमिका बाबासाहेबांच्या विचारांशी पूर्णपणे जुळणारी नव्हती, असे मत डॉ. जाधव यांनी व्यक्त केले. डॉ. आंबेडकरांना मंत्रिमंडळात घेतले, याचे सर्वस्वी कारण महात्मा गांधी होते, असे सांगत गांधी यांच्या काही जमेच्या बाजूही आपण पुस्तकातून मांडल्या असल्याचे त्यांनी सांगितले.
...
आजच्या तरुणांसाठी
पहिल्या पुस्तकाविषयी डॉ. जाधव म्हणाले की, आजच्या तरुण पिढीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर नेमके कोण होते, त्यांचे विचार काय होते आणि त्यांनी देशाच्या उभारणीत कोणते योगदान दिले, हे समजणे आवश्यक आहे. यासाठी बाबासाहेबांचे विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी त्याच पिढीला समजेल अशा सोप्या आणि सहज भाषेत हे पुस्तक लिहिले आहे, तर दुसऱ्या पुस्तकाबाबत ते म्हणाले, डॉ. आंबेडकर आणि महात्मा गांधी, पंडित नेहरू तसेच काँग्रेस यांच्यातील संबंधांचा इतिहास केवळ संघर्षापुरता मर्यादित नव्हता. त्यामध्ये काही मुद्द्यांवर सामंजस्य, तर अनेक महत्त्वपूर्ण प्रश्नांवर तीव्र मतभेदही होते. या दोन्ही बाजूंचा ऐतिहासिक संदर्भांसह सम्यक आढावा या पुस्तकात घेण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.