

तटकरेंवरील टीकेविरोधात राष्ट्रवादी आक्रमक
शिवदास कांबळेंचा शिवसेना नेत्यांना इशारा
पनवेल, ता. १७ (बातमीदार) : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुनील तटकरे यांच्यावर शिवसेनेच्या नेत्यांकडून होत असलेल्या वैयक्तिक टीकेचा राष्ट्रवादी काँग्रेसने तीव्र निषेध केला आहे. तटकरेंच्या राजकीय प्रभावाला थेट आव्हान देता येत नसल्याने रामदास कदम, आमदार महेंद्र दळवी आणि आमदार महेंद्र थोरवे यांच्याकडून वैयक्तिक पातळीवर टीका केली जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शिवदास कांबळे यांनी केला. टीका करताना मर्यादा ओलांडू नका, अन्यथा त्याला जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशाराही त्यांनी शिवसेना नेत्यांना दिला.
सुनील तटकरे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असून कोकणातील राजकारणात त्यांचे महत्त्वपूर्ण स्थान आहे. त्यांच्या राजकीय भूमिका आणि निर्णयांवर विरोधकांनी टीका करणे गैर नाही; मात्र ही टीका वैयक्तिक पातळीवर जाणे योग्य नाही. राजकीय मतभेद व्यक्त करताना राजकीय संस्कृती, नीतिमत्ता आणि शिष्टाचाराचे भान राखणे आवश्यक आहे, असे कांबळे यांनी स्पष्ट केले.
तटकरे पक्ष सोडतील किंवा त्यांचा राजकीय प्रभाव कमी होईल, अशी अपेक्षा बाळगणाऱ्यांनी आधी स्वतःच्या राजकीय कारकिर्दीचा विचार करावा, असा टोलाही त्यांनी लगावला. तटकरेंना राजकारणातून संपविण्याची भाषा करणाऱ्यांचेच राजकीय अस्तित्व धोक्यात येऊ शकते, असे सांगत त्यांनी शिवसेना नेत्यांच्या वक्तव्यांचा निषेध केला.
महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष सत्तेत सहभागी आहेत. अशा परिस्थितीत मित्रपक्षातील वरिष्ठ नेत्यांवर सार्वजनिक व्यासपीठावरून होणारी वैयक्तिक टीका युतीतील समन्वयाला बाधा आणू शकते. त्यामुळे राजकीय मतभेद चर्चेतून सोडवावेत आणि एकमेकांच्या नेतृत्वाचा सन्मान राखावा, असे आवाहन कांबळे यांनी केले. सुनील तटकरे यांच्यावरील वैयक्तिक टीकेचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जाहीर निषेध करीत असल्याचेही त्यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.