

थंडीचा कडाका वाढताच मासळीच्या भावात तेजी
आवक घटल्याने सुरमई १,७०० रुपये किलो; खवय्यांच्या खिशाला बसतोय फटका
तुर्भे, ता. १९ (बातमीदार) : नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून थंडीचा जोर वाढू लागल्याने समुद्रातील मासेमारीवर मोठा परिणाम झाला आहे. परिणामी, मुंबईसह नवी मुंबईतील मासळी बाजारात आवक घटली असून, सुरमई, पापलेट, घोळ आणि जिताडा यांसारख्या माशांच्या भावात मोठी तेजी आली आहे. भाववाढीमुळे खवय्यांच्या खिशाला मोठा फटका बसत असून, सर्वसामान्य ग्राहकांचे महिन्याचे बजेट कोलमडले आहे.
थंडीचा कडाका वाढल्याने समुद्रातील मासेमारीची परिस्थिती बदलली असून, बाजारात मासळीची आवक कमी झाल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात येत आहे. परिणामी, मागणी आणि उपलब्धता यांचा परिणाम भावांवर होत आहे. विशेषतः मोठ्या आकाराच्या आणि चांगल्या प्रतीच्या माशांना ग्राहकांकडून पसंती मिळत असल्याने त्यांचे भाव अधिक वाढले आहेत. मासळीच्या वाढत्या भावांमुळे सर्वसामान्य ग्राहकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. किनारपट्टीवरील अनेक कुटुंबांच्या रोजच्या आहारात मासळीचा समावेश असतो, मात्र भाववाढीमुळे खरेदीचे प्रमाण कमी होण्याची शक्यता विक्रेत्यांकडून व्यक्त होत आहे. आवक घटल्याने विक्रेत्यांनाही वाढीव भावाने मासळी विकावी लागत असल्याचे चित्र आहे.
मासळीचे भाव वाढल्याने सर्वसामान्य ग्राहकांचे बजेट कोलमडत आहे. मासेमारी कमी झाली की भाव वाढतात, हे मान्य असले तरी ग्राहकांना परवडणाऱ्या भावात मासळी मिळणेही गरजेचे आहे. भाववाढ अशीच सुरू राहिल्यास खवय्यांना आवडती मासळी रोजच्या जेवणाऐवजी केवळ सणासुदीला खरेदी करावी लागेल.
- दीप्ती पाटील, मासळीविक्रेती
सध्या मासळीचे भाव (प्रतिकिलो)
मासळी भाव
सुरमई १,७०० रुपये
पॉपलेट १,२०० रुपये
काफरी पॉपलेट १,६०० ते १,८०० रुपये
कोळंबी ७०० ते ८०० रुपये
घोळ १,५०० रुपये
जिताडा १,४०० ते १,५०० रुपये
हलवा १,१०० रुपये
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.