

एक अपत्य संघ कार्याला द्या
धीरेंद्र शास्त्री यांचे आवाहन; भारतदुर्गा शक्तिस्थळाचे भूमिपूजन
नागपूर, ता. २४ : देशवासीयांनी चार अपत्ये जन्माला घालून एक अपत्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यासाठी समर्पित करावे. देशावर येणाऱ्या कठीण परिस्थितीत संघ स्वयंसेवकच देशसेवेसाठी पुढे असतात, असे प्रतिपादन बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी केले.
डॉ. आबाजी थत्ते सेवा आणि संशोधन संस्थेद्वारे जामठा येथील नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या परिसरात प्रस्तावित भारतदुर्गा शक्ती स्थळाच्या भूमिपूजन सोहळ्यात शुक्रवारी (ता. २४) ते बोलत होते. या वेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, श्री जुना आखाडा पीठाधीश्वर आचार्य महामंडलेश्वर स्वामी अवधेशानंद गिरी, स्वामी गोविंददेव गिरी महाराज, चिन्मय मिशनचे स्वामी मित्रानन्द महाराज, बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री, साध्वी ऋतुंभरा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, डॉ. आबाजी थत्ते सेवा आणि संशोधन संस्थेचे अध्यक्ष सुनील मनोहर, सचीव शैलेश जोगळेकर उपस्थित होते.
धीरेंद्र कृष्ण शास्त्री पुढे म्हणाले, ‘भारत मातृप्रधान देश आहे. जेव्हा भारतदुर्गा मंदिर बनेल तेव्हा देश शक्तीसंपन्न होईल व अखंड भारत बनेल. संपूर्ण जगात फक्त भारतातच मातेचा जयजयकार होतो. जगात महिलांना भोग्य मानले जाते, मात्र भारतात महिलांना पूज्य मानले जाते.’
१८ भुजा असलेली भारतदुर्गा ही शक्तीची मूर्ती आहे. या मंदिरातून देशभराला प्रेरणा मिळेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. भारतदुर्गा शक्तीस्थळामागे भारत निर्माणाची प्रेरणा आहे, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले.
भारत केवळ भूमी नाही, तर जगदंबेचे स्वरूप आहे. संघाचे कार्य ईश्वरीय कार्य आहे. भारतात ५१ शक्तिपीठे असून भारतदुर्गा मंदिर ५२ वे शक्तिपीठ ठरेल, असा विश्वास स्वामी अवधेशानंद गिरी यांनी व्यक्त केला. हिंदूंची शक्ती भाषा, पक्ष राजकारण, प्रांतीय राजकारणात विभाजित झाली आहे. एकत्रित आले तर आपण जगाला झुकवू शकतो, असे साध्वी ऋतंभरा म्हणाल्या. ज्ञानेश्वरांचे पसायदान हेच रामराज्याचे वर्णन आहे, असे मत स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांनी व्यक्त केले.
प्रत्येकाला ‘भारतमय’ बनावे लागेल : भागवत
भारतमातेची पूजा करायची असेल तर प्रत्येकाला ‘भारतमय’ बनावे लागेल आणि त्यासाठी भारताला जाणून घ्यावे लागेल, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले. भारतमातेची पूजा या मंदिरातच नव्हे तर संपूर्ण भारतात व्हायला हवी, असे ते म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.