मुदतबाह्य सलाईन प्रकरणात रुग्णाचा मृत्यू; परिचारिकेसह दुसऱ्या परिसेविकेवर आणि एका फार्मासिस्टवर निलंबनाची कारवाई मृताच्या कुटुंबाला 10 लाखांची आर्थिक मदत जाहीर; निष्काळजीपणा कबूल केल्याची महापौरांची माहिती

मुदतबाह्य सलाईन प्रकरणात रुग्णाचा मृत्यू; परिचारिकेसह दुसऱ्या परिसेविकेवर आणि एका फार्मासिस्टवर निलंबनाची कारवाई मृताच्या कुटुंबाला 10 लाखांची आर्थिक मदत जाहीर; निष्काळजीपणा कबूल केल्याची महापौरांची माहिती
Published on

मुदतबाह्य सलाईनमुळे रुग्णाचा मृत्यू
कुटुंबीयांना १० लाखांची मदत; दोन परिचारिका निलंबित

नवी मुंबई, ता. ३ (वार्ताहर) : वाशी येथील नवी मुंबई महापालिकेच्या रुग्णालयात मुदतबाह्य सलाईन लावल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणातील रुग्ण गोपीराम खडसे (५०) यांचा खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना बुधवारी (ता. ३) रात्री मृत्यू झाला. या गंभीर प्रकरणात महापालिकेने दोन परिचारिका आणि एका फार्मासिस्टला निलंबित केले असून, मृताच्या कुटुंबीयांना १० लाखांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. नवी मुंबईच्या महापौर सुजाता पाटील यांनी गुरुवारी (ता. ३) पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
गोपीराम खडसे यांना ताप आणि चक्कर येत असल्याने ३१ ऑगस्टला वाशीतील महापालिकेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्राथमिक उपचारानंतर त्यांना वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले. मात्र १ सप्टेंबरला दुपारनंतर त्यांची प्रकृती खालावली. त्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी हिरानंदानी रुग्णालयात हलविण्यात आले होते. उपचारादरम्यान खडसे यांना मुदत संपलेली सलाईन लावण्यात आल्याचा दावा त्यांच्या नातेवाइकांनी केला होता. मुदतबाह्य सलाईन लावल्यानंतर रुग्णाची प्रकृती बिघडल्याचा आरोप करीत नातेवाइकांनी संबंधितांवर कारवाईची मागणी केली होती. यासाठी नातेवाइकांसह बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी वाशी रुग्णालयात ठिय्या आंदोलनही केले.
‘‘संबंधित परिचारिकेने सलाईनच्या मुदतीची तारीख तपासली नसल्याचे कबूल केले. रुग्णाला सलाईन देण्यापूर्वी तिची मुदत तपासणे ही संबंधित आरोग्य कर्मचाऱ्यांची जबाबदारी आहे. आरोग्य क्षेत्रात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांनी ही जबाबदारी अधिक गांभीर्याने पार पाडणे अपेक्षित आहे. या प्रकरणात एका परिचारिकेसह दुसऱ्या परिसेविकेवर आणि एका फार्मासिस्टवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे,’’ असे महापौर सुजाता पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
दरम्यान, रुग्णाला सुरुवातीला मलेरिया झाल्याचे निदर्शनास आले. पुढील उपचारादरम्यान मेंदूचा मलेरिया (सेरेब्रल मलेरिया) तसेच डेंग्यूचीही लागण झाल्याचे समोर आले. त्यामुळे रुग्णाची प्रकृती अत्यंत गंभीर होती. मुदतबाह्य सलाईनमुळेच रुग्णाचा मृत्यू झाला का, याबाबत वैद्यकीय चौकशी आणि अहवालानंतरच स्पष्ट निष्कर्ष काढता येईल, असेही महापौरांनी सांगितले.
रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीमुळे झालेल्या या गंभीर घटनेची जबाबदारी स्वीकारत मृत गोपीराम खडसे यांच्या कुटुंबीयांना १० लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची घोषणा महापौर सुजाता पाटील यांनी केली. ही मदत कोणत्याही प्रकारचा उपकार नसून, कुटुंबातील कर्त्या व्यक्तीच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबावर आलेला आर्थिक भार कमी करण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. भविष्यात अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी आरोग्य व्यवस्थेमध्ये आवश्यक ती खबरदारी घेतली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
----------------------------------------------

‘चौकशीनंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट’
गोपीराम खडसे यांच्या मृत्यूमागे मुदतबाह्य सलाईन, मलेरिया, सेरेब्रल मलेरिया, डेंग्यू किंवा इतर वैद्यकीय कारणे यापैकी नेमके कोणते कारण जबाबदार आहे, हे सखोल वैद्यकीय चौकशी आणि अहवालानंतरच स्पष्ट होणार आहे. मात्र सलाईनची मुदत तपासण्यात झालेली निष्काळजी मान्य करीत महापालिकेने दोन परिचारिकेंसह एका फार्मासिस्टवर निलंबनाची कारवाई केल्याने या प्रकरणाला आता अधिक गंभीर वळण मिळाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com