सचिव महेंद्र हरपाळकर यांच्यावरील हल्ल्यानंतर अधिकारी-कर्मचाऱयांचे अनिश्चित काळासाठी काम-बंद आंदोलन सुरक्षिततेची ठोस हमी मिळेपर्यंत कामकाज नाही

सचिव महेंद्र हरपाळकर यांच्यावरील हल्ल्यानंतर अधिकारी-कर्मचाऱयांचे अनिश्चित काळासाठी काम-बंद आंदोलन सुरक्षिततेची ठोस हमी मिळेपर्यंत कामकाज नाही
Published on

अधिकारी-कर्मचाऱ्यांचे काम बंद
एमपीएससीच्या सचिवांना काळे फासल्याच्या निषेधार्थ आंदोलन
नवी मुंबई, ता. १२ (वार्ताहर) : संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी एमपीएससीच्या सचिवांना काळे फासल्याच्या निषेधार्थ आयोगाच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आजपासून अनिश्चित काळासाठी काम बंद आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. सुरक्षिततेची ठोस आणि प्रभावी हमी शासनाकडून मिळेपर्यंत काम बंद आंदोलन सुरूच राहणार असल्याचे अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आले.
आयोगाचे सचिव हरपाळकर यांच्यावर हल्ला करणाऱ्या कार्यकर्त्यांनी गोळ्या घालू व ठोकून काढू अशा धमक्या दिल्या आहेत. त्यामुळे अधिकारी आणि कर्मचारीवर्गात भीती आणि असुरक्षिततेचे वातावरण असल्याचे आंदोलक कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. पेपरफुटी व गैरप्रकारांमुळे विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झालेला संताप, त्यांच्या भावनांचा आम्ही आदर करतो. दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे. ही आमचीही ठाम भूमिका आहे, मात्र काही व्यक्तींच्या चुकीची किंमत सर्वच अधिकारी-कर्मचाऱ्यांवर लादणे चुकीचे असल्याचे स्पष्टीकरण अधिकारीवर्गाने दिले आहे.

आंदोलकांच्या प्रमुख मागण्या
सचिव महेंद्र हरपाळकर यांच्याशी गैरवर्तन करणाऱ्या व धमकावणाऱ्या व्यक्तींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी. सोशल मीडियावर अधिकारी-कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांची नावे जोडून खोट्या बातम्यांवर पूर्णपणे आळा घालावा. अशी पुनरावृत्ती टाळण्यासाठी प्रशासकीय पातळीवर कठोर सुरक्षा उपाययोजना आखाव्यात, आदी प्रमुख मागण्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी केल्या आहेत.

Marathi News Esakal
www.esakal.com