तमिळनाडूत चेंगराचेंगरीत ३३ मृत्युमुखी
तमिळनाडूमध्ये चेंगराचेंगरीत ३३ मृत्युमुखी
अभिनेते विजय यांच्या सभेत मृत्यूचे तांडव; १२ जण जखमी
करूर (तमिळनाडू), ता. २७ (पीटीआय) : दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेते-राजकारणी विजय यांच्या सभेत शनिवारी झालेल्या चेंगराचेंगरीत ३३ जणांचा मृत्यू, तर १२ जण जखमी झाले. मृतांमध्ये मुले आणि महिलांचा समावेश असल्याचे बोलले जाते. विजय यांच्या येथील सभेसाठी ३० हजारांपेक्षा जास्त जणांचा समुदाय जमला होता. चेंगराचेंगरीनंतर बेशुद्ध पडलेले, जखमी झालेल्यांना रुग्णालयात दाखल केले.
विजय यांच्या ‘तमिळगा वेत्री कळघम’ या पक्षातर्फे सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेसाठी सहा तासांपेक्षा जास्त काळ पक्षाचे समर्थक आणि नागरिक थांबून होते. विजय हे सभेच्या स्थळी उशिरा पोहोचले, असे वरिष्ठ पोलिस अधिकारी डेव्हिडसन देवासिरवथम यांनी स्पष्ट केले. या दुर्घटनेनंतर राज्याचे आरोग्यमंत्री एम. सुब्रमणीयन तातडीने करूरकडे रवाना झाले असून, मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी करूरचे जिल्हाधिकारी व्ही. सेंथिल बालाजी यांना परिस्थितीवर लक्ष ठेवण्याचे आदेश दिले आहेत. ‘‘करूरमधून येणाऱ्या बातम्या चिंताजनक आहेत. चेंगराचेंगरीत बेशुद्ध पडून रुग्णालयात दाखल झालेल्या नागरिकांना तत्काळ वैद्यकीय उपचार मिळावेत, अशा सूचना मी दिल्या आहेत,’’ असे स्टॅलिन यांनी ‘एक्स’वर नोंदविलेल्या प्रतिक्रियेत म्हटले आहे. दरम्यान, सत्ताधारी द्रमुक पक्षाने (डीएमके) बेपर्वाईबद्दल विजय यांना अटक करण्याची मागणी केली आहे.
नक्की काय घडले?
- करूर येथील विजय यांच्या सभेसाठी हजारो लाेक जमले
- विजय यांना सभास्थळी पोहोचण्यास उशीर झाला
- उकाड्यामुळे अनेक जण बेशुद्ध पडण्यास सुरुवात
- नागरिक बेशुद्ध पडू लागल्यानंतर विजय यांनी भाषण थांबविले
- प्रचंड गर्दीमुळे रुग्णवाहिकांना घटनास्थळी पोहाेचण्यात अडचणी
- विजय यांनी भाषण थांबवून उपस्थितांच्या दिशेने पाण्याच्या बाटल्या फेकल्या
न्यायालयाने दिले होते निर्देश
विजय यांच्या पक्षाने प्रचारसभेपूर्वी समर्थकांसाठी कठोर सुरक्षा आणि वर्तन नियमांचा आग्रह धरला होता.
तिरुचीतील त्यांच्या सभेत झालेल्या गोंधळानंतर मद्रास उच्च न्यायालयाने सार्वजनिक मालमत्तेच्या नुकसानीबाबत महत्त्वाचे निर्देश दिले होते. पक्षाने कार्यकर्त्यांना विजय यांचे स्वागत सोहळे आयोजित करू नयेत, त्यांच्या वाहनाच्या ताफ्याचा पाठलाग करू नये आदी सूचना केल्या होत्या. तसेच गर्भवती महिला, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आणि आजारी व्यक्तींनी सभांना प्रत्यक्ष उपस्थित राहू नये व ऑनलाइन माध्यमातून कार्यक्रम पाहावा, असे आवाहन केले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.