
रसायनीमार्गे पेण-शिर्डी एसटी सुरू करा!
रसायनी, ता. ९ (बातमीदार) : रसायनी परिसरातून नाशिक, शिर्डीला जाण्यासाठी थेट एसटी बसची सुविधा नसल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. प्रवाशांची ही गैरसोय लक्षात घेऊन रसायनीमार्गे पेण-शिर्डी एसटी बस सकाळी सुरू करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
रसायनी पाताळगंगात कारखानदारीनंतर आता अतिरिक्त पाताळगंगा औद्योगिक क्षेत्राचा विकास झपाट्याने होऊ लागला आहे. वासांबे मोहोपाडा, तसेच इतर ग्रामपंचायतीमधील गावांत बांधकाम व्यावसायिकांचे गृहप्रकल्पही उभे राहात आहेत. पनवेल, नवी मुंबई उपनगरातील नागरिक घरांसाठी पसंती देत आहे. परिणामी, परिसरातील गावांची लोकसंख्या अजून वाढत जाणार आहे. या परिसरांतून पुणे, नाशिककडे जाण्यासाठी एकही एसटी बसची सोय नाही. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे. पेणहून रसायनी, पनवेल, कल्याण, भिवंडी, कसारा, इगतपुरी, नाशिक, सिन्नर आणि शिर्डी या मार्गावरून एसटी बस सोडण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या बसने मार्गावरील गाव तसेच नाशिक, शिर्डी या धार्मिकस्थळी जाणार्या भाविकांची चांगली सोय होईल. रसायनी परिसरात लोकसंख्या वाढत असल्याने बसला प्रवासी भारमान मिळेल, असे वासांबे मोहोपाडा येथील सामाजिक कार्यकर्ते विनायक भोईर यांनी सांगितले.