
रसायनी फाट्यावर सर्कल नसल्याने अपघाताची भीती
रसायनी, ता. १६ (बातमीदार) : दांड-पेण मुख्य रस्त्यावरील रसायनी फाट्यावर तीन रस्ते एकत्र मिळतात. याच ठिकाणी वळण घेताना रस्ता धोकादायक बनला आहे. अपघाताची शक्यता असल्याने खबरदारीचा म्हणून उपाय म्हणून येथे सर्कल बांधण्यात यावे, अशी मागणी वाहनचालक आणि इतर नागरिकांनी केली आहे.
रसायनी फाट्यावर मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील दांडफाटा येथून मोहोपाडामार्गे रसायनी आणि कोनफाटा येथून सावळेमार्गे रसायनी; तसेच मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील आपटे फाटा येथून आपटेमार्गे रसायनी असे तीन रस्ते एकत्र येतात. अतिरिक्त पाताळगंगा औद्योगिक क्षेत्रात आणि क्षेत्राबाहेरील कारखानदारी वाढत असल्याने येथे कामगारांची ये-जा असते. तसेच रसायनी पाताळगंगा परिसरातील अनेक गावांत बांधकाम व्यावसायिकांचे गृहप्रकल्प उभे राहत असल्याने नागरिकांचीही वर्दळ असते. अशा वेळी रसायनी फाटा येथे वाहन वळताना सर्कल नसल्यामुळे वाहनचालकांना असुरक्षित वाटत आहे. याशिवाय अपघाताची भीतीही वाहनचालकांना आहे. यापूर्वी या ठिकाणी अपघात झाल्याचे नागरिकांनी सांगितले. त्यामुळे रसायनी फाट्यवर सर्कल बांधण्यात यावे, अशी मागणी तुराडे ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच विश्वनाथ गायकवाड यांनी आणि इतरांनी केली आहे.