
पाताळगंगात पाण्याची नासाडी
रसायनी, ता. ३० (बातमीदार) : पाताळगंगा औद्योगिक क्षेत्रात एमआयडीसीची मुख्य जलवाहिनीच्या मार्गावर एक ठिकाणी पाणीगळती होत आहे. दरम्यान येथे गळती होऊन पाणी वाया जात असल्याने नागरिक नाराजी व्यक्त करत आहे. एमआयडीसीने दुरुस्तीचे काम करून पाणीगळती थांबवावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
पाताळगंगा औद्योगिक क्षेत्रातील कैरे येथील एमआयडीसीच्या जलशुद्धीकरण केंद्राच्या मुख्य जलवाहिनीद्वारे पाताळगंगा आणि अतिरिक्त पाताळगंगा औद्योगिक क्षेत्रातील कारखाने तसेच चावणा, जांभिवली, कराडे खुर्द या ग्रामपंचायतीच्या हद्दीतील गावांना पाणीपुरवठा करण्यात येतो. इनॉक्स इअर प्रॉडक्ट लिमिटेड कंपनीच्या बाजूच्या जलवाहिनीला गळती लागल्याने पाणी गटारात मिसळत आहे. काही महिन्यांपासून दररोज पाण्याची नासाडी होत असल्याने कारखानदार आणि नागरिक आश्चर्य व्यक्त करत आहे. ही पाणीगळती एमआयडीसीने थांबवण्यासाठी दुरुस्तीचे काम हाती घ्यावे, अशी मागणी कैरे गावातील अमित जंगम आणि नागरिकांनी केली आहे.