
पाताळगंगा नदीला जलपर्णीचा विळखा
रसायनी पाण्याबरोबरच सांडपाण्यामुळे प्रदूषणात वाढ
रसायनी, ता. १ (बातमीदार) : पाताळगंगा नदीला जलपर्णीचा विळखा पडला आहे. एमआयडीसीच्या उदंचन केंद्रातील सांडपाणीबरोबरच बंधाऱ्यातील पाण्यावर जलपर्णी जमा झाल्याचे दिसते आहे. अनेक कारखानदार रासायनिक पाणी नदीपात्रात सोडतात. काही गावांतील सांडपाणीही सोडले जात असल्याने नदी प्रदूषित झाली आहे. अडीच तीन महिन्यांपासून नदीत मोठ्या प्रमाणात जलपर्णी वाढली आहे. ही जलपर्णी काढून नदीपात्राची साफसफाई करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.
खोपोली, पाताळगंगा औद्योगिक क्षेत्रात अनेक कारखाने आहेत. सर्वच कारखान्यातील सांडपाण्यावर याठिकाणी प्रक्रिया झाल्यास कोणी चोरून दूषित पाणी नदीत सोडणार नाहीत. शिवाय नागरी वसाहतींतही ग्रामपंचायतींच्या माध्यमातून प्रक्रिया केंद्र उभारून सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यात यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ता विनायक भोईर यांनी स्पष्ट केले आहे.
पाताळगंगा नदीवर एमआयडीसीच्या जॅकवेलमधील अशुद्ध पाणी येते. साठवण बंधाऱ्यात पाण्याबरोबर जलपर्णी मोठ्या प्रमाणात वाहत येते. जलपर्णी बंधाऱ्यात अडकली तर पाणी पुरवठ्यावर परिणाम होऊ शकतो. खबरदारी म्हणून वेळोवेळी जलपर्णी काढण्यात येत आहे.
- विठ्ठल पाचपुंडे, उपअभियंता, एमआयडीसी
सीईटीपी केंद्रात एमआयडीसीतील अनेक कारखान्यांतील रासायनिक सांडपाण्यावर प्रकिया करण्यात येते. कारखान्यातील प्रदूषित सांडपाणी सीईटीपी केंद्रात सोडताना पाण्याचे नुमने तपासणी करण्यात येतात. केंद्रात प्रक्रिया झालेले पाणी समुद्रात सोडण्यात येते.
- अमित शेट्टी, सीईटीपी, विभाग प्रमुख