
बस बंद पडल्यामुळे प्रवाशांची गैरसोय
रसायनी, ता. २० (बातमीदार) : रसायनी परिसरातील वाशिवलीपर्यंत नवी मुंबई महापालिकेच्या परिवहन उपक्रमाअंतर्गत बेलापूर-पनवेल-दांड मार्गे वाशिवली परतीच्या बसफेऱ्या चालवण्यात येतात. दरम्यान बस नादुरुस्त होण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे गैरसोय होत असल्याने प्रवाशांमधून नाराजी व्यक्त होत आहे. शनिवार (ता.१८) सकाळी साडेदहाच्या सुमारास वासांबे-मोहोपाडा येथील वीज महावितरणच्या कार्यालयाजवळ पनवेलहून वाशिवलीकडे जाणारी बस बंद पडली. त्यामुळे मोहोपाडा, पिल्लई महाविद्यालय, पाताळगंगा औद्योगिक क्षेत्र, वाशिवली आदी ठिकाणी जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय झाली तर शुक्रवारी सकाळी वाशिवली, मोहोपाड्याहून साडेनऊ वाजता पनवेलकडे जाणारी बस जुन्या राष्ट्रीय महामार्गवरील शेंडुग टोल नाक्याजवळ बंद पडली होती, असे प्रकाश म्हात्रे या प्रवाशाने सांगितले. बस नादुरुस्त झाली की वाहक मागून येणारी बस थांबवून त्यात प्रवाशांना बसवतात, मात्र यात वेळे वाया जातो शिवाय प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतो. एनएमएमटीने बसच्या देखभाल-दुरुस्तीकडे लक्ष द्यावे, नादुरुस्त बस मार्गस्थ करू नये, अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे.