संकटकाळातील भक्तांची तारणहार

संकटकाळातील भक्तांची तारणहार

Published on

संकटकाळातील भक्तांची तारणहार
आंबेपुरी पाखाडीत शितळादेवीचे पुरातन मंदिर
रेवदंडा, ता. २१ (बातमीदार) : अलिबाग तालुक्याच्या दक्षिणेला वसलेल्या आंबेपुरी पाखाडीत शितळादेवीचे पुरातन मंदिर आहे. नारळी-पोफळीच्या हिरव्या गर्द छायेतील चौल नाका ते आग्राव जोड रस्त्यावरील देवीला संकटकाळातील तारणहार अशी ओळख आहे.
पूर्वी दक्षिणेला चौलची खाडी होती. आता परिसरात भर घालून खाडीवरती घरे, नारळी-पोफळींच्या बागा अस्तित्वात आल्या आहेत. याच ठिकाणी चंपावती नगरीत देवीची उपासक असलेली स्वरूप, सुंदर, निर्मळ, उदार, धर्मशील, कोमल मनाची चंपावती राणी राज्य करीत होती. चंपावती नगरीला समुद्राचा वेढा पडला होता. समुद्राच्या लाटेमुळे नगरीची तटबंदी तुटत होती. समुद्राचे पाणी घरांमध्ये घुसून दरवर्षी मोठे नुकसान होत होते. यामुळे हतबल झालेल्या राणीने देवीच्या उपासनेला सुरुवात केली. नवरात्रीत आठ दिवस केलेल्या उपासनेला अखेर यश आले. शितळा देवीने चंपावतीला संकटातून सोडवल्याची अख्यायिका आहे.
-------------------------------
ऐतिहासिक नोंद
मंदिराचा प्रथम जीर्णोद्धार इ.स.१५८ मध्ये बाबुभट उपाध्ये यांनी द्रव्य मिळवून केल्याची नोंद आहे. १७६७ मध्ये विसावी सरसुभेदार यांनी ब्राह्मण भोजन घातले. १७५८ मध्ये एप्रिलच्या सुमारास आंग्रे कुटुंब देवीच्या दर्शनाला आले होते, तर १७९२ मध्ये मुलांबद्दलचा नवस फेडण्यासाठी आले असल्याच्या नोंदी सापडतात. त्या वेळी हत्ती, घोडे सरंजाम व काही लष्कर बरेच दिवस तळ ठोकून होते. त्यानंतर बाबुराव आंग्रे दर्शनाला आले होते, तर दसऱ्याच्या दिवशी आंग्रे कुटुंब देवीच्या दर्शनासाठी येत होते.
-------------------------------
अनेकांची कुलदेवता
पूर्वीचे आंग्रेकालीन लाकडी कौलारु मंदिराची जागा नव्याने जीर्णोद्धार केलेल्या मंदिराने घेतली आहे. महाराष्ट्र तसेच अन्य राज्यातील अनेक कुटुंबांची ही देवी कुलदेवता आहे. या ठिकाणी वर्षभर मंगळवार, शुक्रवार, रविवार भाविक दर्शनाला येत असतात. या भागातील गोळबादेवी, भरडादेवी उपदेवता आहेत. नवरात्रीत विविध कार्यक्रमांनी गजबजून गेलेले मंदिर जागृत देवस्थान आहे.
-----------------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com