ब्रेक फेल बस घुसली फलाटावर, प्रवाशांना चिरडले बालक ठार, तीन प्रवासी गंभीर
ब्रेक फेल बसने प्रवाशांना चिरडले
बालक ठार, तीन प्रवासी गंभीर
सकाळ वृत्तसेवा
सिन्नर, ता. १९ : ब्रेक फेल असलेली सिन्नर आगाराची बस डेपोतून बाहेर काढून चालकाने फलाटावर आणली. मात्र ती थेट फलाटात घुसून स्थानकात बसलेल्या प्रवाशांच्या अंगावर गेली. यात नऊवर्षीय बालक ठार झाला, तर बालकाच्या आईसह तीन प्रवासी जखमी झाले. या घटनेनंतर प्रवाशांकडून रोष व्यक्त केला जात आहे.
सकाळी पावणेअकराच्या सुमारास ही घटना घडली. देवपूरला जाणारी बस (एमएच १३ सीयू ८२६७) पाचव्या क्रमांकाच्या फलाटासमोर येताच ती स्थानकात प्रवासी बसण्याच्या ठिकाणी घुसली. या वेळी दापूर येथे जाणाऱ्या बसची वाट पाहात असलेला आदर्श योगेश बोऱ्हाडे (वय ९) हा बसखाली चिरडला गेला. या दुर्घटनेत तो जागेवर ठार झाला. आदर्शची आई गौरी योगेश बोऱ्हाडे (३०) याही गंभीर जखमी झाल्या. त्यांच्याशेजारी उभ्या असलेल्या मीराबाई प्रकाश आव्हाड आणि अन्य एक महिला जखमी झाली. अचानक झालेल्या या दुर्घटनेने स्थानकात गोंधळ उडाला. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. जखमींना रुग्णवाहिकेतून खासगी दवाखान्यात हलविण्यात आले.
मोठी दुर्घटना टळली
घटनेवेळी स्थानकात सर्वच फलाटांवर प्रवाशांची गर्दी होती. पाचव्या क्रमांकावर बस प्रवाशांत घुसताच ती स्थानकाच्या खांबाला धडकली. त्यामुळे फलाटात उभे असलेले व बाकांवर बसलेले प्रवासी सुदैवाने वाचले. बस खांबाला धडकली नसती तर मोठी जीवितहानी झाली असती.
देवदर्शन करून परतलेल्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर
आदर्श हा आई गौरी व आजी-आजोबांसह पंढरपूरला दर्शनासाठी गेला होता. सकाळी ते स्थानकावर उतरले. दापूर येथे जाण्यासाठी बसची वाट पाहत असतानाच काळाने आदर्शवर घाला घातला. अपघातस्थळी आजोबा नातवला उचलून घेऊन मदतीची याचना करीत होते.
सिन्नर : आगारात फलाटावर प्रवाशांत घुसलेली बस.
सिन्नर : आगारातील अपघात घडलेला पाचव्या क्रमांकाचा फलाट.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

