मोठ्या होर्डिंगचा धोका कायम

मोठ्या होर्डिंगचा धोका कायम

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. १४ : मुंबईत होर्डिंग कोसळल्याने काही जणांना आपला जीव गमवावा लागला; मात्र अशा दुर्घटनानंतरही मोठ्या होर्डिंगवर कारवाई होत नाही. कल्याण-डोंबिवली परिसरात जवळपास १८२ बेकायदा मोठे होर्डिंग आहेत. डोंबिवली स्टेशन येथील पादचारी पुलाला तर चक्क एलईडी स्क्रीन लावले आहेत. शाळा, कॉलेज, स्टेशन परिसरात उभारलेले होर्डिंग कोसळल्यास मोठ्या अपघाताची भीती आहे; मात्र अशा दुर्घटना घडू नयेत, यासाठी प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारच्या उपाययोजना करण्यात येत नाहीत.

ठाणे, कल्याण शिळ रोडवर यापूर्वीही होर्डिंग्ज कोसळून अपघात घडले आहेत, त्यात काही नागरिक जखमी झाले आहेत; मात्र त्यानंतरही बेकायदा मोठ्या होर्डिंगवर कारवाई केलेली नाही. कल्याण, डोंबिवलीत तब्बल १८२ च्या आसपास बेकायदा महाकाय होर्डिंग्ज असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. मान्सूनपूर्व पाऊस वादळी वाऱ्यासह येत असल्याने शहरात झाडे पडणे, बॅनर, होर्डिंग कोसळणे अशा घटना घडतात. शहरातील गर्दीच्या ठिकाणी होर्डिंग लावण्यासाठी महापालिकेची रीतसर परवानगी घेणे आवश्यक असते; पण अनेक जण अशा प्रकारची कोणतीही परवानगी न घेता दिसेल, त्या ठिकाणी होर्डिंग लावतात. शहरातील चौक, रस्ते, नाके अशा विविध भागांत होर्डिंग दिसून येत आहेत; मात्र महापालिका प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होत आहे.

कल्याण शहरातील प्रेम ऑटो, पत्री पूल, स्टेशन परिसर, बाईचा पुतळा तसेच डोंबिवलीतील पूर्व व पश्चिमेचा स्टेशन परिसर, कल्याण-शिळ रोड, पाथर्ली रोड येथे राजरोसपणे मोठमोठी होर्डिंग्ज लावली असल्याचे आढळून आले आहे. डोंबिवली पूर्वेतील स्टेशन परिसरात असलेल्या पादचारी उड्डाणपुलाला मोठे जाहिरात फलक लावण्यात येतात. गेल्या काही दिवसांपासून तर येथे दोन मोठे एलईडी स्क्रीन लावले आहेत. स्टेशन परिसर, शाळा, कॉलेज परिसरात असे होर्डिंग लावले गेले आहेत.

कारवाईचा इशारा
कल्याण, डोंबिवली शहरात होर्डिंग्ज लावण्याचे काम ठेकेदाराला दिलेले असते. सुरक्षेचे नियम न पाळता बेकायदेशीर होर्डिंग्ज लावली आहेत, अशांना नोटिसा बजावल्या असून १५ दिवसांच्या आत स्ट्रक्चरल ऑडिट सादर करण्याचे आदेश पालिका आयुक्तांनी दिले आहेत. तसेच या सर्व बेकायदा होर्डिंग्जवर कारवाई करण्यात येईल, असे पालिका प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे.

खिडकाळी, काटई नाका, घारिवली परिसरात धोका
कल्याण-डोंबिवलीसह ठाणे पालिका हद्दीतून जाणाऱ्या संत सावळाराम महाराज मार्गावर मोठ्या प्रमाणात होर्डिंग्जचे लोखंडी स्ट्रक्चर तयार झाले आहेत. या लोखंडी स्ट्रक्चरवर लावण्यात येणारे होर्डिंग सोसाट्याच्या वाऱ्यात विजेच्या तारांवर पडण्याची भीती व्यक्त होत आहे. या मार्गावरील निळजे पूल, खिडकाळी, काटई नाका, घारीवली व या परिसरात धोका सर्वाधिक आहे. मात्र महावितरण व संबंधित परवानग्या देणाऱ्या अधिकाऱ्यांमध्ये समन्वय दिसून येत नसल्याचे दिसून येत आहे. याआधीदेखील या परिसरात असे अपघात घडलेले आहेत; मात्र या होर्डिंग्जच्या वाढत्या प्रकारांवर प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारचा लगाम लावला जात नाही.

पालिका प्रशासनाला पत्रव्यवहार
मोठागाव माणकोलीदरम्यान अनधिकृत होर्डिंग उभारणीसाठी स्ट्रक्चर उभारणी करण्यात येत आहे. याविषयी माजी नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी पालिका व पोलिसांना पत्रव्यवहार केला आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत मोठागाव माणकोलीदरम्यान उल्हास खाडीवर सहापदरी खाडीपुलाचे बांधकाम व रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे. दरम्यान सेवारस्ता व खाडीपुलाच्या बाजूला अनधिकृत होडिंग उभारण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच सदर होर्डिंग उभारण्यासाठी प्राधिकरणाची परवानगी घेतलेली नाही. या अनधिकृत होर्डिंगवर पालिका प्रशासनाने कारवाई करावी, त्यासाठी पोलिस संरक्षण मिळावे, असा पत्रव्यवहार केला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com