बनावट नाव, पाकिस्तानी पासपोर्ट!

बनावट नाव, पाकिस्तानी पासपोर्ट!
Published on

बनावट नाव, पाकिस्तानी पासपोर्ट!
मलंगगड परिसरातून एकाला अटक; मुंबई एटीएसकडून तपास

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. १९ : पाकिस्तानात चार ते पाच वर्षे वास्तव्य करून बनावट नावाने पाकिस्तानी पासपोर्ट मिळविल्यानंतर त्याच आधारे भारतात परतलेल्या एका व्यक्तीला हिललाईन पोलिसांनी मलंगगड परिसरातून ताब्यात घेतले. याप्रकरणी पारपत्र अधिनियमानुसार गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता मुंबई एटीएसकडूनही स्वतंत्र तपास सुरू करण्यात आला आहे.
अटक केलेल्या इसमाची ओळख पोलिसांनी अद्याप जाहीर केलेली नाही. त्याचा जन्म मलंगगड परिसरात झाला असून, काही वर्षांपूर्वी तो भारतीय पासपोर्टवर पाकिस्तानातील नातेवाइकांकडे गेला होता. तेथे चार ते पाच वर्षे वास्तव्य केल्यानंतर त्याने भारतीय पासपोर्ट नष्ट करून कथितरीत्या बनावट नावाने पाकिस्तानी पासपोर्ट मिळविला. या पासपोर्टच्या आधारे तो भारतात परतला. त्यानंतर त्याने पुन्हा भारतीय पासपोर्ट मिळविण्यासाठी अर्ज केला; मात्र त्याचा पूर्वीचा प्रवास आणि पाकिस्तानी पासपोर्टची माहिती पासपोर्ट विभागाच्या निदर्शनास आली. विभागाने याबाबत पोलिसांना माहिती दिल्यानंतर हिललाईन पोलिसांनी कारवाई केली. दोन-तीन दिवसांपूर्वी त्याला मलंगगडावरून ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर पारपत्र अधिनियमानुसार गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली.
पाकिस्तानात वास्तव्य करून आल्याने पोलिसांनी मुंबई एटीएसलाही याची माहिती दिली. एटीएसकडून या प्रकरणाचा समांतर तपास सुरू आहे. प्रकरण संवेदनशील असल्याने पोलिसांनी सध्या एफआयआर, संबंधित कागदपत्रे आणि आरोपीची ओळख जाहीर करण्यास नकार दिला आहे.

Marathi News Esakal
www.esakal.com