महसूल सप्ताहनिमित्त डोलवी येथे विविध शासकीय दाखल्यांचे वाटप
महसूल सप्ताहनिमित्त डोलवी येथे विविध शासकीय दाखल्यांचे वाटप
वडखळ, ता. ५ (बातमीदार) : राज्य शासनाच्या महसूल विभागातर्फे सुरू करण्यात आलेल्या महसूल सप्ताहाच्या अनुषंगाने पेण तालुक्यातील डोलवी गावात विविध शासकीय दाखल्यांचे मोफत वाटप करण्यात आले. बुधवारी ता.४ झालेल्या या उपक्रमाचे उद्घाटन आमदार रवींद्र पाटील आणि प्रांताधिकारी प्रवीण पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी सभापती सुरेश म्हात्रे, सरपंच परशुराम म्हात्रे, नायब तहसीलदार नितीन परदेशी, प्रसाद कालेकर, ग्रामसेवक, तलाठी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या उपक्रमांतर्गत नागरिकांना उत्पन्न प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, वयाचे दाखले, रेशनकार्ड, सातबारा उतारे आदी शासकीय कागदपत्रे गावातच उपलब्ध करून देण्यात आली. महसूल खात्याशी संबंधित सर्व आवश्यक सेवा थेट नागरिकांच्या दारी पोहोचविण्यात पेण तालुका अग्रगण्य आहे, असे गौरवोद्गार आमदार पाटील यांनी यावेळी काढले.
उपक्रमात जेएसडब्लु कंपनी आणि संजीवनी हॉस्पिटल यांच्या सहकार्याने मोफत आरोग्य शिबिरही आयोजित करण्यात आले होते. यामध्ये एकूण १९५ ग्रामस्थांनी आरोग्य तपासणी करून औषधे घेतली. या उपक्रमासाठी आत्माराम बेटकेकर आणि सर्व उपस्थित अधिकाऱ्यांचे आभार सरपंच परशुराम म्हात्रे यांनी मानले.
.............
मोफत ई-रिक्षा प्रवासाची घोषणा
या कार्यक्रमात आणखी एका महत्त्वपूर्ण घोषणेची भर पडली. येत्या महिन्यापासून डोलवी ग्रामपंचायतीकडून इ-रिक्षा मोफत प्रवास योजना सुरू करण्यात येणार आहे. ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांना ओळखपत्र दाखवून डोलवी ते वडखळ आणि परतीचा प्रवास मोफत करण्यात येणार आहे. उर्वरित ग्रामस्थांसाठी केवळ एक रुपयात ही सेवा उपलब्ध करून देण्यात येणार असून, हा निर्णय ग्रामीण भागातील प्रवास सुलभ करण्याच्या दृष्टिकोनातून घेण्यात आला आहे, असे सरपंचांनी स्पष्ट केले.