

पेण तालुक्यातील दिग्गज उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद
वडखळ, ता. ८ (बातमीदार) ः रायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी पेण तालुक्यात पार पडलेल्या मतदानानंतर आता सर्वांच्या नजरा निकालाकडे लागल्या आहेत. तालुक्यातील पाच जिल्हा परिषद गट आणि १० पंचायत समिती गणांमधील अनेक दिग्गज उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले असून, सोमवारी (ता. ९) होणाऱ्या मतमोजणीत पेणचा कोण बाजी मारणार, याचा फैसला होणार आहे.
दादर जिल्हा परिषद गटातून आमदार रवी पाटील यांचे पुत्र माजी सदस्य वैकुंठ पाटील भाजपचे उमेदवार आहेत, तर त्यांच्या विरोधात शेकापचे पेण तालुका चिटणीस प्रल्हाद पाटील उमेदवार आहेत. या मतदारसंघात दुरंगी लढत होत असून, या अगोदर या मतदारसंघातून शेकापचे प्रमोद पाटील विजयी झाले होते. शेकापचा हा परंपरागत मतदारसंघ असून, गेल्या काही वर्षापासून वैकुंठ पाटील यांनी या मतदारसंघात आपला जनसंपर्क वाढवून भाजपचे प्रस्थ वाढवले आहे, परंतु हा मतदारसंघ शेकाप आपल्याकडे राखणार की भाजप आपल्याकडे खेचून नेईल, हे आज समजणार आहे.
शिहु जिल्हा परिषद गटातून आमदार रवी पाटील यांच्या सून शर्मिला पाटील भाजपच्या उमेदवार आहेत, तर त्यांच्याविरोधात ठाकरे गटाच्या जिल्हा संपर्कप्रमुख प्रसाद भोईर यांच्या पत्नी पल्लवी भोईर उमेदवार आहेत. या मतदारसंघात शिवसेना विरुद्ध भाजप असा सरळ सामना आहे.
वडखळ जिल्हा परिषद मतदार संघात जिल्ह्यातील मातब्बर पक्ष आमने-सामने उभे ठाकले आहेत. या मतदारसंघात चौरंगी लढत होत असून, यामध्ये शेकापकडून माजी जिल्हा परिषद सदस्य संजय जांभळे निवडणूक लढवत आहेत, तर ठाकरे गटाकडून पेण तालुकाप्रमुख समीर म्हात्रे उमेदवार आहेत, तर भाजपकडून माजी जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर म्हात्रे उमेदवार आहेत. शिंदे गटाकडून मिलिंद पाटील निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मिलिंद पाटील हे भाजपचे रायगड जिल्हा सरचिटणीस होते. भाजपने त्यांना उमेदवारी नाकारल्याने त्यांनी शिंदे गटात प्रवेश करून शिंदे गटाकडून ते जिल्हा परिषदेची निवडणूक लढवत आहेत. या गटातील निवडणूक राजकीय पक्षांची अस्तित्व ठरवणारी निवडणूक ठरणार आहे.
जिल्हा परिषदेच्या महलमिऱ्या डोंगर गटातून लक्ष्मण निरगुडा ठाकरे गटाकडून निवडणूक लढवत आहेत, तर भाजपकडून जनार्दन भस्मा उमेदवार आहेत. शिंदे गटाकडून संतोष भस्मा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या मतदारसंघात तिरंगी लढत होत असून, निवडणूक चुरशीची होणार आहे.
जिते जिल्हा परिषद गटातून भाजपकडून दरवडा, तर शिवसेना ठाकरे पक्षाकडून अरुणा पवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
पंचायत समितीसाठीही काट्याची लढत
पेण पंचायत समितीच्या १० जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत आजी-माजी पंचायत समिती सदस्यांचे आजी-माजी सरपंच निवडणुकीच्या रिंगणात एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. यामध्ये वडखळ माजी सरपंच राजेश मोकल, माजी पंचायत समितीचे सदस्य प्रदीप म्हात्रे, वाशी माजी सरपंच गोरख पाटील, भाजपचे पेण तालुका अध्यक्ष संजय डंगर, माजी पंचायत समिती सदस्य संजय भोईर आदि दिग्गज उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.