

पालघर, ता. २२ : वाढवण बंदराच्या परिसरात २,५०० ते ५,००० एकर जागेवर भव्य रासायनिक पार्क उभारण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी (ता. २२) मुंबईत केली. गोरेगाव येथे इंडोकेमच्या उद्घाटन सोहळ्यात त्यांनी ही घोषणा करताना या भव्य प्रकल्पासाठी राज्य सरकार जमीन उपलब्ध करून देईल, तसेच केंद्र सरकारने या प्रकल्पाला मंजुरी द्यावी, अशी मागणी केली.
केंद्रीय रसायने व खते मंत्री जे. पी. नड्डा यांनी केंद्राच्या अर्थसंकल्पात ‘भव्य रसायन’ योजनेची घोषणा केल्याचे येथे सांगितले. या योजनेसाठी केंद्र सरकारकडून एक हजार कोटी रुपये, तर राज्य सरकारकडून ५०० कोटी रुपये उपलब्ध करून दिले जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली. पर्यावरणविषयक मंजुरी मिळविण्यासाठी केंद्र सरकार सहकार्य करेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
‘विकसित भारत’ आणि २०४० पर्यंत एक लाख कोटी अमेरिकी डॉलरची अर्थव्यवस्था साध्य करण्याच्या उद्दिष्टाशी हा उपक्रम जोडण्यात आला आहे, मात्र विकासाच्या या महत्त्वाकांक्षी आराखड्यात डहाणूच्या पर्यावरणीय संरक्षणाची हमी कशी दिली जाणार, हा प्रश्न आता केंद्र आणि राज्य सरकारसमोर असेल.
पर्यावरणीय भवितव्याबाबत प्रश्न
प्रकल्पाची घोषणा केली खरी; मात्र डहाणू तालुका पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील क्षेत्र म्हणून ओळखला जात असताना एवढ्या मोठ्या रासायनिक औद्योगिक संकुलाची घोषणा झाल्याने पालघरच्या पर्यावरणीय भवितव्याबाबत महत्त्वाचे प्रश्न उपस्थित झाले आहेत. औद्योगिक विकासाच्या घोषणेसोबत पर्यावरण संरक्षणाची ठोस भूमिका, प्रस्तावित जागेची स्पष्टता आणि स्थानिक नागरिकांच्या हिताबाबत पारदर्शक माहिती देण्याची गरज यानिमित्ताने अधोरेखित झाली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.